आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासार्वजनिक ठिकाणी तोकडे कपडे परिधान करून अंगप्रदर्शन करणारी माॅडेल उर्फी जावेद हिच्या वर्तनावर राज्य महिला आयोगाने स्वाधिकाराने (सुमोटो) दखल का घेतली नाही, असा सवाल भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी गुरुवारी (ता.५) केला. राज्य महिला आयोग दुटप्पी असून आयोगाने दखल घेतली नसली तरी भाजप उर्फीचा नंगानाच चालू देणार नाही, असा इशारा वाघ यांनी दिला.
वाघ म्हणाल्या, उर्फीच्या कृत्याकडे दुर्लक्ष करणा-या महिला आयोगाने मराठी वेब मालिका ‘अनुराधा’ च्या अश्लील पोस्टरची स्वाधिकाराने दखल घेतली होती. त्याअंतर्गत अभिनेत्री तेजस्विनी पंडीत आणि दिग्दर्शक संजय जाधव यांना नोटीस बजावली होती. इतकी सतर्कता दाखवणाऱ्या आयोगाला उर्फीचे कृत्य व्यक्तिस्वातंत्र्याचा भाग वाटते. आयोगाची ही दुटप्पी भूमिका आहे, असा आरोप वाघ यांनी केला. आपण ज्या समाजात राहतो, त्याचे स्वास्थ्य जपण्याची गरज आहे. उर्फी सारखी महिला हे समाज स्वास्थ्य बिघडवत आहे. उर्फीवर कारवाई करण्यात वेळ वाया घालवायचा नाही, हे महिला आयोगाचे वक्तव्य धक्कादायक असल्याचा दावा वाघ यांनी केला. उर्फीचे ओंगळवाणे व्हिडिओ व्हायरल होत असताना मूकदर्शक राहणाऱ्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना त्या पदावर बसण्याचा अधिकार नाही, असे वाघ म्हणाल्या. सार्वजनिक ठिकाणी होणारे अंगप्रदर्शन रोखण्यासाठी पक्षभेद विसरून सर्वांनी एकत्र यावेे, असे अवाहन वाघ यांनी केले.
सोयीनुसार वाघ गांधारी : रुपाली चाकणकर : “राज्य महिला आयोगाकडे आत्तापर्यंत १० हजार ९०७ तक्रारी आल्या होत्या, पैकी ९ हजार ५२० तक्रारी निकाली काढल्या आहेत. आयोगाने काय करावे हे कुणी सांगायची गरज नाही. ज्या नेत्यांवर लैंगिक अत्याचाराचे आरोप आहेत, ते खासदार राहुल शेवाळे एका कार्यक्रमात व्यासपीठावर बसतात, तेव्हा ताई (चित्रा वाघ) या गांधारीच रुपात असतात का? असा सवाल राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केला.
माझा नंगानाच हा असाच चालू राहील : उर्फी जावेद
उर्फी जावेद गुरुवारी मुंबई विमानतळावर दिसली. त्यावेळी तिला पत्रकारांनी विचारले की, ‘तुझ्या चाहत्यांना काय सांगशील’ त्यावर उत्तर देताना उर्फी म्हणाली, ‘माझा नंगानाच असाच चालू राहील.’ यानंतर ती हसत फ्लाइंग किस देत निघून गेली.
उर्फीवर कारवाई करून अटक करावी : चित्रा वाघ
मुंबई पोलिसांच्या कायदा व सुव्यवस्था विभागाच्या उपायुक्तांची आज आपण भेट घेतली. मुंबईतील रस्त्यावर अंगप्रदर्शन करत फिरणाऱ्या उर्फी जावेदवर तातडीने कायदेशीर कारवाई करून तिला अटक करावी, अशी मागणी केल्याचे चित्रा वाघ यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.