आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात 149 बळी:आश्वासनांचा पूर, मदतीचा दुष्काळ; मुख्यमंत्री चिपळूणमध्ये, केंद्रीय मंत्री राणे तळियेत; पश्चिम महाराष्ट्राच्या पाहणीनंतर मदत जाहीर करणार - मुख्यमंत्री

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वादळे, महापूर हा मुख्यमंत्र्यांचा ‘पायगुण’ : राणे

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पूरस्थितीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी रविवारी मुख्यमंत्र्यांसह अनेक नेत्यांनी दौरे काढले. या दाैऱ्यात सर्वच नेत्यांनी मदतीच्या आश्वासनांचा ‘पूर’ आणला. मात्र प्रत्यक्षात आपत्तीग्रस्तांसाठी मदत किती व केव्हा मिळणार याबाबत मात्र कुणीही स्पष्टपणे सांगितले नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमधील नुकसानीची पाहणी केली. त्यांच्यासोबत पालकमंत्री अनिल परब व सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत व शिवसेना खासदार विनायक राऊत होते.

केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी रायगड जिल्ह्यातील तळिये या दरडग्रस्त गावाला सकाळी भेट दिली. त्यांच्यासोबत विधिमंडळातील दाेन्ही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रवीण दरेकर होते. दुसरीकडे सातारा जिल्ह्यातील देवरूख (ता. वाई) या दरडग्रस्त भागास पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी भेट दिली. शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांसाठी गुरुदत्त कारखान्यावर तात्पुरत्या निवासाची साेय केली आहे, तिथे कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी भेट देऊन त्यांची विचारपूस केली.

वादळे, महापूर हा मुख्यमंत्र्यांचा ‘पायगुण’ : राणे
चिपळूणमध्ये आलेल्या पूरपरिस्थितीवरून भाजप नेते तथा केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. ‘राज्यात पूरस्थिती आली आहे. त्यानंतर चार दिवसांनी मुख्यमंत्री चिपळूणमध्ये आले. हे कसले मुख्यमंत्री आहेत? मी तर म्हणतो राज्याला प्रशासनही नाही आणि मुख्यमंत्रीही नाही. राज्य चालवता येत नसेल तर केंद्राला देऊन टाका. आम्ही वेटिंगवरच आहोत,’ असा हल्ला राणेंनी चढवला. वादळं काय, पाऊस काय, सगळंच चालू आहे. हा मुख्यमंत्र्यांचा ‘पायगुण’ आहे. ते पदावर आले तेच कोरोना घेऊन. त्यांचे पाय बघायला पाहिजेत पांढरे आहेत का ते? आता कुठे त्यांना घरातून ‘डिस्चार्ज’ मिळालाय म्हणून ते फिरत आहेत’, अशी टोलेबाजीही नारायण राणेंनी केली.

आतापर्यंत दोन लाख लोकांचे स्थलांतर

  • राज्यात पूरग्रस्त भागातून सुमारे २ लाख ३० हजार लोकांना सुखरूपपणे बाहेर काढले आहे.
  • आतापर्यंत एकूण १४९ मृत्यू झाले आहेत. तर ५० लोक जखमी असून १०० जण बेपत्ता आहेत.
  • ८७५ गावे बाधित झाली आहेत. ३२४८ जनावरे दगावली आहेत.
  • राज्यात एनडीआरएफची २५, एसडीआरएफ ४, कोस्ट गार्ड २, नाैदल ५, लष्कर ३ पथके मदतीसाठी कार्यरत आहेत.
  • पूरस्थितीचा सामना करण्यासाठी रायगड- रत्नागिरीस प्रत्येकी २ कोटी, तर इतर जिल्ह्यांना प्रत्येकी ५० लाख मदत.
  • चिपळूणला ५ तात्पुरत्या निवारा केंद्रांची स्थापना केली.

मुख्यमंत्री म्हणाले : पश्चिम महाराष्ट्राच्या पाहणीनंतर मदत जाहीर करणार
१. नारायण राणे पंतप्रधान आवास योजनेतून तळिये दरडग्रस्तांना पक्की घरे बांधून दिली जातील.
२. देवेंद्र फडणवीस एनडीआरएफच्या निधीतून दरडग्रस्तांना योग्य ती मदत केली जाईल.
३. उद्धव ठाकरे स्थानिक स्तरावर मदतीसाठी यंत्रणा उभी करणार.
४. बाळासाहेब पाटील : शासन पूरग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.
५. सतेज पाटील छावणीतील नागरिक व जनावरांच्या खाण्याचा खर्च राज्य आपत्ती व्यवस्थापन निधीतून भागवला जाईल.

साहेब... काहीतरी करा, नुसते पाहून जाऊ नका - चिपळूणकर
आम्ही आजपर्यंत इतरांना देणारे होतो, या पुराच्या पाण्याने आम्हाला घेणारे केले आहे, असा आक्रोश करत चिपळूण येथील पुराच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना व्यापाऱ्यांच्या संतापाला सामाेरे जावे लागले. बघून जाऊ नका, आम्हाला पुन्हा उभे राहण्यासाठी काहीतरी मदत करा, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली. चिपळूण शहरात २२ जुलै रोजी पुराचे पाणी घुसले. पाण्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्याची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे रविवारी गेले होते. सकाळी ११ वाजता हे नेते अंजनवेल येथे हेलिकाॅप्टरने पोहोचले. चिपळूणच्या बाजारपेठेत पायी फिरून त्यांनी भीषणता पाहिली. पानगल्लीतील महिलेने मदत न मिळाल्याबद्दल ठाकरेंना अक्षरश: जाब विचारला.

‘आम्ही देणारे होतो हो, आज घेणारे झालो आहोत. हे अंगावरचे कपडे इतरांनी दिलेत. दोन वेळचे जेवण दुसऱ्यांकडून घ्यावे लागते, असे म्हणत ‘साहेब, काहीतरी करा, नुसते पाहून जाऊ नका,’ अशी विनवणी या महिलेने केली. बेंदरकर अाळीत व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त केला. दुकानात दोन दिवस १२ फूट पाणी होते. सामानाचा चिखल झाला. तसेच ठेवले तर रोगराई, काढले तर भरपाई नाही, अशी कोंडी झाल्याचे सांगत ‘पंचनाम्याचे तेवढे लवकर बघा’ अशी मागणी व्यापाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना केली. वडनाका भागातील व्यापाऱ्यांनी पिण्याचे पाणी अन् वीज चालू करा, इतकीच मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. भोंगाळे गल्लीतील व्यापारी ‘कर्ज मिळवून द्या साहेब’ असे म्हणाले.

‘सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना कर्जमाफी देते. कोकणाने आजपर्यंत काहीच मागितले नाही, एकदा मदत करा, असे काही व्यापारी मुख्यमंत्र्यांना म्हणाले. दरम्यान, मुख्यमंत्री गाडीत आले अन् गाडीत बसून निघून गेले. त्यांनी काय पाहिले हा प्रश्नच आहे, असे म्हणत व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. कर्जाचे बघा, कोकणाला पुन्हा उभे करा, असे लांबून ओरडून सांगण्याचा व्यापाऱ्यांनी प्रयत्न केला. अनेक व्यापाऱ्यांनी वशिष्ठ व शिव नदीतला गाळ काढण्याची सूचना केली. काही व्यापाऱ्यांनी ‘सूचना न देता धरणातून पाणी सोडू नका’ अशी विनवणी केली. मुख्यमंत्र्यांसोबत शिवसेना आमदार भास्कर जाधव, रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब, सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत, सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत, मुख्य सचिव सीताराम कुंटे होते.

भास्कर जाधव यांच्याकडून अडथळे
मुख्यमंत्र्यांकडे गाऱ्हाणे मांडताना स्थानिक शिवसेना आमदार भास्कर जाधव व्यापाऱ्यांना मोकळेपणाने बोलू देत नव्हते. बास करा, थांबा.. आपले सीएम आहेत, असे म्हणत आमदार जाधव अडथळे आणत होते.

बातम्या आणखी आहेत...