आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यातील रस्त्यांची कामे दर्जेदार करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यासह या कामांसाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे निर्देश देऊन रस्त्यांच्या कामांसाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला जाईल. मात्र, निधीचा विनियोग योग्य प्रकारे न करणाऱ्या आणि गुणवत्ता न राखणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला.
राज्यातील राष्ट्रीय व राज्य महामार्गांवरील खड्ड्यांच्या दुरुस्ती व उपाययोजनांचा बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी आयोजित बैठकीत आढावा घेतला. या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, उद्योगमंत्री सुभाष देसाई, यांच्यासह कोकण, नाशिक, मराठवाडा, पुणे आदी विभागांचे मुख्य अभियंते, राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे वरिष्ठ अभियंते उपस्थित होते.
राज्यातील सर्व राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्गांच्या सद्य:स्थितीचा आढावा घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेले काम लवकर मार्गी लावण्याची सूचना केली. रस्त्यांच्या कामात गुणवत्तेवर सर्वोच्च भर देण्याबरोबरच रस्त्यांच्या कामासाठी कृती आराखडा तयार करावा, निधीची कमतरता पडू देणार नाही. कामचुकार अधिकारी आणि कंत्राटदारांवर कारवाई करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी या वेळी दिल्या.
दर्जाहीन कामे करणाऱ्यांवर कारवाई करा : अशोक चव्हाण
सध्याच्या स्थितीत राज्यातील रस्त्यांच्या कामावर सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग, राज्य रस्ते विकास महामंडळ आणि राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण यांनी संयुक्तपणे मंत्रालयात वॉररूम स्थापन करून रस्त्यांच्या कामांचा आढावा घेण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी दिल्या. तसेच दर्जाहीन कामे करणाऱ्यांवर कारवाई करा, असे निर्देश अशोक चव्हाण यांनी या वेळी बोलताना दिले.
ऑक्टोबरअखेर ५० टक्के निधी वितरित करणार : उपमुख्यमंत्री
अतिवृष्टी आणि पावसामुळे राज्यातील रस्त्यांची अतिशय बिकट अवस्था झाली असून या रस्त्यांच्या कामासाठी अर्थसंकल्पीय तरतुदीपैकी ५० टक्के निधी ऑक्टोबरअखेर वितरित करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या वेळी सांगितले. रस्त्यांच्या कामासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, मात्र रस्त्यांच्या कामाच्या गुणवत्तेवर कोणतीही तडजोड करणार नसल्याचेही उपमुख्यमंत्र्यांनी या वेळी स्पष्ट केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.