आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत 15 वर्षांतील अल्प मतदान:अवघे 31.74% नोंद, मतदान वाढवण्यात उद्धव गट अपयशी

मुंबई25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पार पडलेल्या पहिल्यावहिल्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत गुरुवारी अत्यल्प मतदान नोंदवले गेले. ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या ऋतुजा लटके यांची एकतर्फी उमेदवारी असूनही केवळ ३१.७४ टक्के मतदान झाले. पोटनिवडणुकीतील मतदान अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील गेल्या १५ वर्षांतील अल्प मतदान आहे.

निवडणुकीच्या रिंगणात एकूण सात उमेदवार होते. पैकी ४ अपक्ष, राइट टू रिकाॅल व पीपल्स पार्टीचा प्रत्येकी एक उमेदवार होता. ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके या एकमेव राष्ट्रीय स्तरावरील पक्षाच्या उमेदवार होत्या. भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस व मनसे या बड्या सर्व पक्षांनी उमेदवार दिला नव्हता. तरी येथे नीचांकी मतदान झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

या वेळी अंधेरी पूर्व विधानसभा मतदान क्षेत्रात २ लाख ७१ हजार इतके मतदार पात्र होते. पैकी अवघ्या ३१.७४ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. त्यात भाजपने नोटाचा प्रचार केल्याचा आरोप शिवसेनेने केला होता. त्यामुळे येथे ‘नोटा’ (कुणी पसंत नाही) ला मोठ्या संख्येने मते पडण्याची शक्यता आहे. ‘नोटा’ अधिक असूनही सर्वाधिक मते घेणारा उमेदवार विजयी होतो. प्रथम क्रमांकाची मते घेतलेल्या उमेदवारापेक्षा ‘नोटा’ला अधिक मते पडल्यास निवडणूक रद्द होत नाही किंवा फेरनिवडणूक घेण्यात येत नाही. सर्वाधिक मते मिळालेला उमेदवार विजयी घोषित केला जातो, असे महाराष्ट्र निवडणूक मुख्याधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले.

रविवारी मतमोजणी : रविवार, ६ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. येथे गेल्या तीन निवडणुकांत ४० टक्के मते घेऊन उमेदवार विजयी होत आलेला आहे. या वेळी मात्र ऋतुजा लटके यांना जेमतेम २० टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. येथे नोटाला मोठ्या संख्येने मते पडल्यास ठाकरे गटाच्या शिवसेनेसाठी नामुष्कीची बाब ठरणार आहे.

२०१९ मध्ये ५३ टक्के मतदान २०१९ मध्ये शिवसेनेच्या रमेश लटके यांना ६२ हजार ७७३, भाजपचे ४५ हजार ८०८ तर काँग्रेसचे अमीन कुट्टी यांना २७ हजार ९५१ मते. एकूण ५३. ५५ टक्के मतदान झाले होते.

२०१४ मध्ये ५४.४४ टक्के : २०१४ मध्ये येथे सेनेचे रमेश लटके यांना ५२ हजार ८१७, भाजपचे सुनील यादव ४७ हजार ३३८ तर सुरेश शेट्टी यांना ३७ हजार ९२९ मते. ५४.४४ टक्के मतदान नोंदले होते.

२००९ मध्ये ४९% मतदान : २००९ मध्ये काँग्रेसच्या सुरेश शेट्टी यांना ५५ हजार ९९०, शिवसेनेचे सुरेश लटके यांना ५० हजार ८५२ आणि मनसेच्या संदीप दळवी यांना २५ हजार ५२ मते. एकूण ४९% मतदान झाले होते.

बातम्या आणखी आहेत...