आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलासा:संसर्गाचा दर आता 2.44 टक्क्यांवर, कोरोनाची दुसरी लाट ओसरली; सरकारचे शिक्कामोर्तब

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शाळा, प्रार्थनास्थळे मात्र अजूनही कुलपातच; राजकीय सभा, यात्रा न काढण्याचे केले आवाहन

राज्यात उद्भवलेली प्रलयंकारी कोरोनाची दुसरी लाट आता संपुष्टात आली असून अनेक जिल्ह्यांत कोरोना रुग्णसंख्या शून्यावर आली आहे. तसेच ५० टक्के ज्येष्ठ नागरिकांना आणि ४५ वयाच्या आतील २५ टक्के नागरिकांना कोरोनाची किमान एक लसमात्रा दिली गेल्याने राज्य सरकारने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. राज्याचा साप्ताहिक सरासरी रुग्णबाधेचा दर २.४४ टक्के इतका अल्प आहे. बुधवारी राज्य मंत्रीमंडळाची सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक पार पडली. त्या बैठकीत आरोग्य विभागाने राज्यातील काेरोना स्थितीचे सादरीकरण केले. त्यातील आकडेवारीवरुन कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आल्याच्या दाव्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

नंदुरबार जिल्‍हयात कोरोनाचा एकही रुग्‍ण नाही. तर धुळे, वाशिम, यवतमाळ, भंडारा, वर्धा, गोंदिया या सहा जिल्हयात सक्रिय रुग्णसंख्या दहापेक्षाही कमी आहेत. तसेच परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती, अकोला, बुलढाणा, चंद्रपूर व गडचिरोली या जिल्हयात सक्रिय रुग्णसंख्या १०० पेक्षा कमी आहे. जास्त रुग्णसंख्या असलेल जिल्हयांत सातारा, सांगली, अहमदनगर, पुणे, उस्मानाबाद, सोलापूर, सिंधुदुर्ग यांचा समावेश आहे. गेल्‍या काही दिवसात कोल्हापूर, रत्नागिरी शहरातील रुग्णवाढीचा दर चिंताजनक होता. या जिल्हयांचा साप्ताहिक सरासरी रुग्णवाढीचा दर २.४४ टक्के यापेक्षाही कमी झाला आहे. राज्‍यात सक्रीय रुग्ण संख्या ६१ हजार ३०६ असून रुग्ण बरे होण्याचा दर तब्बल ९६.८७ टक्के इतका झालेला आहे.

तिसऱ्या लाटेला आमंत्रण देऊ नका, खबरदारी घ्या ; मुख्यमंत्र्यांचे आवाहन
राज्यातून कोविडची लाट संपलेली नाही. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करून संसर्ग एका मर्यादेच्या पलिकडे वाढू दिला नाही. यामध्ये ज्याप्रमाणे आपले डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी व फ्रंटलाईन वर्कर्स यांचे यश आहे, तसेच आपण नागरिक म्हणून घेतलेली काळजी देखील महत्वाची आहे. यापुढे प्रत्येक पाऊल सावधपणे टाकणे गरजेचे असून, आपले सगळ्यांचे सहकार्य अपेक्षित आहे. केवळ अर्थचक्र सुरळीतपणे सुरु राहावे म्हणून आपण काही प्रमाणात निर्बंध शिथिल केले आहेत, हे विसरता कामा नये. पण नियमांचा भंग करून राजकीय, सामाजिक, धार्मिक व इतर कार्यक्रम आयोजित करून सर्वसामान्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होईल, अशी काही जणांची वर्तणूक पाहता चिंता वाटते.

आगामी सण आणि उत्सव पाहता आरोग्याच्या नियमांचे उल्लंघन होणार नाही आणि कोविड योद्धा होता आले नाही तरी निदान कोविडदूत बनून तिसऱ्या लाटेला आमंत्रण देणार नाही, याची खबरदारी घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले. कोविडविषयक नियमांचे पालन न केल्याने, तसेच गर्दी जमा करणे, मास्क न लावणे यामुळे स्वत:च्याच नव्हे तर इतरांच्या आरोग्यालाही आपण धोका पोहचवत आहोत. माझे आपणास आवाहन आहे की, कुणाच्याही आमिषाला किंवा चिथावणीला बळी न पडता स्वतःचा व इतरांच्या आरोग्याचा विचार करा. राज्यामध्ये ऑक्सिजनचे मर्यादित उत्पादन आहे. त्यामुळेच आपण निर्बंधाच्या बाबतीत ऑक्सिजनची उपलब्धता हाच निकष लावला आहे. एक जबाबदार नागरिक म्हणून आमच्या प्रयत्नांना आपल्या सहकार्याची खूप आवश्यकता आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

येणाऱ्या विविध सणांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाला दिल्या सतर्कतेच्या सूचना

लसीकरणाचा उच्चांक
राज्यात पाच कोटी सात लाख नागरिकांना लस देण्यात आली आहे. त्यात ४५ वयोगटावरील जवळपास ५० टक्के तर १८ ते ४४ वयोगटातील २५ टक्के नागरिक आहेत. एक कोटी तेहतीस लाख सात हजार नागरीकांना दोन्ही मात्रा दिल्याआहेत.

गर्दी टाळा : सण व उत्सवातील गर्दी व्यवस्थापनासाठी नागरीकांचे सहकार्य घ्या. कोविड नियमांच्या काटेकोर पालनासाठी स्थानिक प्रशासनांनी सर्तकता बाळगण्याची आवश्यकता बैठकीत व्यक्त झाली.

सभा टाळा : दुसरी लाट संपली असली तरी तिसऱ्या लाटेची टांगती तलवार कायम आहे. त्यामुळे राजकीय कार्यक्रम घेऊ नये, आंदोलने करु नका, यात्रा काढू नका, अशी सूचना बैठकीत मुख्यमंत्र्यांनी केली.

प्रार्थनास्थळे कुलपात
दुसरी लाट संपुष्टात आली तरी राज्यातील शाळा तसेच सर्वधर्मीयांची प्रार्थना स्थळे इतक्यात उघडण्यास परवानगी दिली जाणार नाही, असे मंत्रिमंडळ बैठकीत निश्चित झाले.

बातम्या आणखी आहेत...