आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लम्पीमुळे मृत्यू झालेल्या पशूंना शासकीय परिपत्रकानुसार मदत:गायींसाठी आतापर्यंत 10 कोेटी 16 लाख, तर बैलांसाठी 5 कोटी 79 लाखांची नुकसानभरपाई

नागपूर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लम्पी रोगामुळे मृत्यू झालेल्या जनावरांना शासकीय परिपत्रकानुसार मदत दिली जाते. गायींचा मृत्यू झाल्याल 30 हजार रूपये, बैलांचा मृत्यू झाल्यास 25 हजार आणि वासरूंचा मृत्यू झाल्यास 16 हजार रूपये मदत दिली जाते.

आतापर्यंत गायींच्या मृत्यूसाठी 10 काेटी 16 लाख, बैलांच्या मृत्यूसाठी 5 कोटी 79 लाख आणि वासरांच्या मृत्यूसाठी 2 कोटी 54 लाख रूपयांची नुकसानभरपाई देण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त देवेंद्र जाधव यांनी दिली. आतापर्यंत एकूण 18 कोटी 49 लाखांची नुकसानभरपाई देण्यात आली आहे.

लम्पी चर्म रोगाबाबत विभागाच्या काही सेवांची आवश्यकता वाटत असल्यास अथवा माहिती द्यायची असल्यास संबंधितांनी जवळच्या पशुवैद्यकीय दवाखाना/तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय/जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय अथवा जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त स्तरावर किंवा पशुसंवर्धन विभागाचा टोल फ्री क्र. 1800-2330-418 अथवा राज्यस्तरीय कॉल सेंटर मधील पशुसेवेचा टोल फ्री क्र.1962 तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन विभागाने केले आहे.

राज्यामध्ये आतापर्यत 34 जिल्ह्यांमधील एकूण 3666 संसर्गकेंद्रांमध्ये लंपी चर्मरोग प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधित गावांतील एकूण 2,82,595 बाधित पशुधनापैकी एकूण 2,05,110 पशुधन उपचाराने राेगमुक्त झालेले आहे. उर्वरीत बाधित पशुधनावर उपचार सुरू आहेत. बाधित पशुधनापैकी 19,077 पशुधनाचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत लंपी चर्मरोगामुळे मृत्युमुखी पडलेल्या गोवंशीय पशुधनाच्या 7274 पशुपालकांच्या खात्यांवर 18 कोटी 49 लाखांची नुकसानभरपाई जमा करण्यात आली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये एकूण 144.12 लाख लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामधून एकूण 137.97 लाख पशुधनास मोफत लसीकरण करण्यात आले आहे. खासगी संस्था, सहकारी दूध संघ आणि वैयक्तिक पशुपालकांनी करून घेतलेले लसीकरण यांची आकडेवारी नुसार महाराष्ट्रात सुमारे 98.61 % गोवंशीय पशुधनाला लसीकरण झाले आहे.

लम्पी चर्म रोगाचा आलेख राज्यात घटत आहे. लम्पी चर्म रोग हा केवळ गोवंश वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. हा रोग कीटकांपासून पसरतो. हा आजार गाई व बैलांपासून किंवा गाईच्या दुधापासून मानवामध्ये संक्रमित होऊ शकत नाही. हा आजार फक्त पशुधनामध्ये आढळून येतो. तसेच रोगाचा उपचार लक्षणे दिसल्यानंतर वेळेतच सुरू झाल्यास बहुतांश पशु उपचाराला चांगला प्रतिसाद देत आहेत. तरी सर्व पशुपालकांनी लम्पी चर्म रोगाच्या संभाव्य लक्षणांकडे बारकाईने लक्ष ठेवावे व त्वरित नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा.

बातम्या आणखी आहेत...