आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मदत:‘लम्पी’ने मृत्यू झालेल्या गायींसाठी आतापर्यंत 10  काेटी 16 लाख, बैलांसाठी 5 कोटी 79 लाखांची मदत

नागपूर8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लम्पी त्वचा रोगामुळे मरण पावलेल्या जनावरांना शासकीय परिपत्रकानुसार मदत दिली जात आहे. गाय मरण पावल्यास ३० हजार रुपये, बैल मरण पावल्यास २५ हजार आणि वासरू मरण पावल्यास १६ हजार रुपये मदत दिली जाते. या नुसार आतापर्यंत गायींच्या मृत्यूसाठी १० काेटी १६ लाख, बैलांच्या मृत्यूसाठी ५ कोटी ७९ लाख आणि वासरांच्या मृत्यूसाठी २ कोटी ५४ लाख रुपयांची मदत देण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त देवेंद्र जाधव यांनी दिली. आतापर्यंत पशुपालकांना एकूण १८ कोटी ४९ लाखांची मदत देण्यात आली आहे.

राज्यामध्ये आतापर्यंत ३४ जिल्ह्यांमधील एकूण ३६६६ संसर्ग केंद्रांमध्ये लम्पी त्वचा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधित गावांतील एकूण २ लाख ८२ हजार ५९५ बाधित पशुधनापैकी एकूण २ लाख ५ हजार ११० पशुधन उपचाराने राेगमुक्त झालेले आहे. उर्वरीत बाधित पशुधनावर उपचार सुरू आहेत. तर बाधित पशुधनापैकी १९,०७७ पशुधनाचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत लम्पीमुळे मृत्युमुखी पडलेल्या गोवंशीय पशुधनाच्या ७,२७४ पशुपालकांच्या खात्यांवर १८ कोटी ४९ लाखांची मदत जमा करण्यात आली आहे. तसेच लम्पीचा आलेख राज्यात घटत आहे. हा रोग केवळ गोवंश वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. हा रोग कीटकांपासून पसरतो. हा आजार फक्त पशुधनामध्ये आढळून येतो. संबंधितांनी जवळच्या पशुवैद्यकीय दवाखाना, तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय, जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त स्तरावर किंवा पशुसंवर्धन विभागाचा टोल फ्री क्र. १८००-२३३०-४१८ संपर्क साधावा असे पशुसंवर्धन विभागाने कळवले आहे.

बातम्या आणखी आहेत...