आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भंडाऱ्यात आयसीयूत आगडोंब:उमलण्याआधी 10 कळ्या कोमेजल्या, रुग्णालयांत आगीपासून सुरक्षेचे उपाय करावेत : सर्वाेच्च न्यायालय

भंडारा (अतुल पेठकर/ प्रशांत देसाई )3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अवघा दीड दिवस ते ३० दिवसांच्या बारसेही न झालेल्या बाळांचा मृत्यू
  • घटकाभरही मातृत्वाचं सुख न लाभलेल्या मातांनी ‘आम्हाला आमचं बाळ द्या’ असा टाहाे फाेडला...

येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील शिशू केअर युनिटमध्ये शुक्रवारी मध्यरात्री उसळलेल्या अग्नितांडवाने दहा तान्हुल्यांना मृत्यूच्या कराल दाढेत ओढून नेले. या भीषण अागीत ३ नवजात तान्हुल्यांचा होरपळून, तर ७ बाळांचा श्वास गुदमरून मृत्यू झाला. मृतांत ८ मुली व २ मुलांचा समावेश आहे. या वेळी तीन सुरक्षा रक्षकांनी जिवाची बाजी लावून ७ बाळांना वाचवले.

शिशू केअर युनिटमध्ये दीड दिवस ते दोन महिन्यांपर्यंतच्या कमी वजनाच्या बाळांवर उपचार सुरू होते. मध्यरात्री २ वाजता नर्सला युनिटमध्ये अचानक धुराचे लाेट दिसले. तिने मदतीसाठी हाक दिल्यानंतर प्रत्यक्ष मदतकार्य सुरू होईपर्यंत दहा तान्हुल्यांना आगीने आपल्या विळख्यात घेतले. मॉनिटर रूममध्ये असलेल्या ७ बाळांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. हृदय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. राज्य सरकारने मृतांच्या पालकांना ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

मेन गेट उघडलेच नाही, मागील दरवाजा तोडून आत जाईपर्यंत बाळांचे श्वास थांबले
न्यूबॉर्न केअर युनिट (एसएनसीयू) रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर आहे. येथे इन बॉर्न (येथेच जन्मलेली बाळे) व आऊट बॉर्न (इतर ठिकाणी जन्मलेली बाळे) अशा दोन खोल्या आहेत. आग आऊट बॉर्नला लागली होती. नर्सने त्याची माहिती सुरक्षा रक्षक राजू दहिवालेला दिली. त्यांच्यानुसार, युनिटचे गेटच उघडत नव्हते. नंतर अग्निशमनचे जवान आले, मात्र गेट न उघडल्याने ते मागील गेटवर पोहोचले. गेट न उघल्याने ते तोडावे लागले. तोवर सर्व बाळांचा मृत्यू झाला होता. इन बॉर्न खोलीतील ७ बाळांना वाचवण्यात यश आले.

दिव्य मराठी भूमिका
भविष्यच भस्मसात!

भंडाऱ्यातील ही काळरात्र म्हणजे आपल्या व्यवस्थेच्या नाकर्तेपणाचा पुरावा आहे. ज्या राज्यात असे घडते, त्या राज्याला भविष्याची काही आशा नाही. एवढ्या महत्त्वाच्या ठिकाणी ‘फायर ऑडिट’ होत नाही, लोक कामाच्या वेळा पाळत नाहीत, कोणी दक्ष नाही, याला काय अर्थ आहे? या दहा नवजातांचे मारेकरी कोण, या प्रश्नाचे सरकारकडे काय उत्तर आहे? या शहराचे नाव बदला आणि त्या निवडणुकीसाठी व्यूहरचना आखा, याशिवाय काही धोरण सरकारकडे आहे का? ‘दिव्य मराठी’ आज अस्वस्थ आहे आणि आम्ही आता स्वस्थ बसणार नाही. या लेकरांसाठी आम्ही यंत्रणेला सळो की पळो करून सोडणार आहोत. या खुनी, मारेकरी व्यवस्थेला उत्तरे द्यायला भाग पाडणार आहोत. जे दोषी आहेत, त्यांना शिक्षा होईपर्यंत आणि मूलभूत बदल होईपर्यंत आम्ही आवाज उठवत राहू.
- संपादक

कठोरात कठोर कारवाई : मुख्यमंत्री मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा : भाजप
ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईचे निर्देश दिल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. भविष्यात अशा दुर्घटना होऊ नयेत म्हणून राज्यातील सर्वच रुग्णालयांचे फायर ऑडिट व्यवस्थित करण्याचे निर्देशदेखील त्यांनी दिले. दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

रात्री २ वाजता रुग्णालयात कुणीही ड्यूटीवर नव्हते...

  • ड्यूटीवरील नर्सने सांगितले, पहाटे २ वाजता युनिटचे गेट उघडले तेव्हा धुराचे लोट होते. म्हणजेच जेव्हा आग लागली तेव्हा तेथे कुणीही स्टाफ नव्हता.
  • बाळाच्या या युनिटमध्ये रात्री एक डॉक्टर आणि ४ किंवा ५ नर्सेसची ड्यूटी असते. घटनेच्या वेळी त्या कुठे होत्या?
  • ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे म्हटले जाते. मात्र उपकरणांच्या तपासणीचा नियम आहे. मग आग कशी लागली?
  • वाॅर्डात स्मोक डिटेक्टरही लावलेले नव्हते. ते लावलेले असते तर आगाची माहिती आधीच कळाली असती आणि या बाळांचे प्राण वाचले असते.

१३ तासांचे आयुष्य
४ वर्षांच्या मुलीच्या पाठीवर शुक्रवारी दुपारी १ वाजून ५ मिनिटांनी दुसरा मुलगा झाला म्हणून घरी आनंद हाेता, पण रात्री अडीच वाजता आलेल्या एका फोनने हा आनंद हिरावून घेतला. हे सांगताना श्रीनगर गावातील विकेश शिवदास धुडसे यांच्या डोळ्यातील अश्रूही आटले होते. पत्नीला जबर धक्का बसल्याने तिच्यावर उपचार सुरू आहेत.

अनाथ बाळाचा मृत्यू
केसलवाडा वाघ येथे ३० डिसेंबर रोजी तिचकुळे राइस मिलजवळ तणसाच्या ढिगाऱ्यांवर तीनदिवसीय गोंडस बाळ कुणीतरी सोडून गेले होते. गावातील भुमेश ढेंगे या युवकाने त्याला रुग्णालयात दाखल केले. दीड किलो वजनाचे बाळ असल्याने त्याला लाखणी रुग्णालयातून भंडाऱ्यात हलवले. तेही या आगीत दगावले.

७ तान्हुले वाचवले
गुजरातमध्ये रुग्णालयाच्या आगीच्या घटनेनंतर सुप्रीम कोर्टाने म्हटले होते की, ‘रुग्णालयांत फायर सेफ्टी अधिकारी नसेल तर राज्यांनी कारवाई करावी.’ तरीही निष्काळजीपणा थांबला नाही अन् त्याचा परिणाम या मातांना सोसावा लागला.

आऊट बॉर्नच्या सर्व बाळांचा मृत्यू, इन बॉर्नमधील ७ वाचले
हे चित्र भयंकर आहे, पण वास्तवापासून दूर पळायचे नाही ही भूमिका ‘दिव्य मराठी’ची आहे. जड अंतःकरणाने हे छायाचित्र प्रकाशित करताना अपेक्षा एवढीच की, या कळ्या ज्यांनी कुस्करल्या त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि भविष्यात कोणत्याही मातेच्या पुढ्यात हे दृश्य येऊ नये.

परिणाम : राज्यातील सर्वच रुग्णालयांचे फायर ऑडिट करा : मुख्यमंत्र्यांचे आदेश
कारण : शाॅर्टसर्किटमुळे आगीचा अंदाज, अग्निसुरक्षेच्या पुरेशा उपाययोजना नाहीत
घटना : शासकीय रुग्णालयातील शिशू केअरमध्ये ८ मुलींसह १० बाळांचा मृत्यू

बातम्या आणखी आहेत...