आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज नागपंचमी विशेष:सर्पदंशानंतर दिरंगाईमुळे मृत्यू झालेल्या दोन माणसांच्या बदल्यात मारले जातात 1000 साप

नागपूर4 महिन्यांपूर्वीलेखक: अतुल पेठकर
  • कॉपी लिंक
  • पीटीआरमधील 21 गावांत करण्यात आलेल्या सर्वेक्षणातील धक्कादायक वास्तव

सापांद्वारे चुकून मारल्या गेलेल्या प्रत्येक २ माणसांसाठी एक हजार साप माणसांकडून एकतर बदला म्हणून किंवा भीतीमुळे आणि जागरूकतेच्या अभावामुळे मारले जातात हे धक्कादायक वास्तव सातपुडा फाउंडेशनने पेंच व्याघ्र प्रकल्पातील बफर झोनमधील २१ गावांत करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. विशेष म्हणजे सर्पदंश झाल्यानंतर ८९% ग्रामस्थांचा विश्वास परंपरागत वैदू, भूमका वा आदिवासी औषधीवर असतो. ही औषधे उपलब्ध झाली नाही तरच ते प्राथमिक आरोग्य केंद्रात जातात, असे आढळून आले आहे.

८१% गावकऱ्यांची पीएचसीमध्ये, तर ९०% गावकऱ्यांची ग्रामीण रुग्णालयात अँटिव्हेनम हे सर्पदंशावरील औषध उपलब्ध नाही अशी ठाम समजूत आहे. परिणामी सर्पदंश झालेल्या बहुतांश रुग्णांना नागपूर येथे मेडिकलमध्ये आणले जाते. यात प्रवासात दोन ते तीन तास वेळ जात असल्याने रुग्ण दगावतो, असे स्पष्ट झाले आहे. सर्पदंश होणाऱ्यांमध्ये ७१% पुरुष आहेत, तर ५८% प्रकरणात जीव गेल्याची उदाहरणे आहेत. सर्पदंश झालेल्यांमध्ये ६५% १८ ते ४० वर्षे वयोगटातील प्रौढ आहेत. आणि जीव गेलेल्यांमध्ये ५८% २५ वर्षांपेक्षा जास्त आहेत. त्यापैकी अर्ध्याहून अधिक ५० वर्षांपेक्षा जास्त आहेत. सर्पदंशातील ७६% प्रकरणे शेतजमिनींमध्ये होतात.

परंतु ५०% जीवघेणी प्रकरणे अस्वच्छ वातावरणामुळे गावांमध्ये आणि आसपासच्या घरांमध्ये, ४४% जीवघेणी प्रकरणे शेतजमिनींमध्ये होतात. ६७% सर्पदंशाची प्रकरणे कामकाजाच्या वेळेस (सकाळी ९ ते संध्याकाळी ५) होतात, परंतु ६०% जीवघेणी प्रकरणे सकाळच्या वेळेत होतात. सर्पदंशाच्या ८५% घटना भात लागवडीच्या हंगामात (पावसाळा आणि वसंत ऋतू) होतात, परंतु ५०% घातक प्रकरणे हिवाळ्यात होतात. ३३% साप ओळखले जातात. सर्पदंश प्रकरणात केवळ ३३% साप ओळखले जातात. विषारी सापांमध्ये बहुतांश कोब्रा किंवा रसेल वाइपर आहेत. बहुतेक साप कुठेतरी दिसल्यावरच मारले जातात.

हे आहेत उपाय : गावकऱ्यांमध्ये सापांबद्दल असलेले गैरसमज दूर करणे, सर्पदंश झाल्यास गावातच प्रथमोपचार करण्यासाठी गावातीलच दोन-तीन युवकांना प्रशिक्षित करणे, पीएचसी आणि ग्रामीण रुग्णालयात अँटिव्हेनम असल्याची खात्री करून देणे, गावकऱ्यांमध्ये साप न मारण्याविषयी जागृती करणे आदी उपाय यावर परिणामकारक ठरू शकतात.

सर्पमित्रांची रीतसर नोंदणी
राज्यातील सर्पमित्रांची परीक्षा घेऊन त्यांची वन खात्याकडे रीतसर नोंदणी करणार असल्याची माहिती मानद वन्यजीव रक्षक कुंदन हाते यांनी दिली. वैज्ञानिकदृष्ट्या तज्ज्ञ असलेल्या सर्पतज्ज्ञांच्या उपस्थितीत सर्पमित्रांची कौशल्य तपासणी परीक्षा घेण्यात येईल. त्यानंतर त्यांना प्रमाणपत्र देण्यात येईल. सर्पमित्रांच्या आईवडिलांचे नाहरकत प्रमाणपत्र घेऊनच त्यांना मान्यता देण्यात येईल, असे हाते यांनी सांगितले. या प्रमाणीत सर्पमित्रांची यादी वन विभागाकडे राहील.

बातम्या आणखी आहेत...