आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:महाराष्ट्रातील धर्मादाय हॉस्पिटलमध्ये निर्धन आणि गरीब रुग्णांसाठी 10 हजार खाटा राखीव, मात्र मिळत नाही लाभ

नागपूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुठल्याही मोठ्या आजारपणात भल्याभल्यांना आर्थिक प्रश्न भेडसावतो. सधन माणसांचे निभून जाते. पण गरीब आणि निर्धनाचे मात्र हाल होतात. मात्र राज्यातील तब्बल 476 ‘ट्रस्ट हॉस्पिटल’मध्ये निर्धन आणि दुर्बल घटकातील रुग्णांसाठी 10 हजारांहून अधिक खाटा राखीव असून त्यांना मोफत किंवा सवलतीच्या दरात वैद्यकीय उपचार मिळणे सहज शक्य आहे. त्यासाठी केवळ दारिद्रयरेषेखाली असल्याचे पिवळे रेशनकार्ड किंवा तहसीलदारांनी दिलेला वार्षिक उत्पन्नाचा दाखला आवश्यक आहे अशी माहिती आरोग्य कार्यकर्ते विनोद शेंडे यांनी दिली.

महाराष्ट्रातील धर्मादाय हॉस्पिटल म्हणजेच ट्रस्ट हॉस्पिटलमध्ये निर्धन आणि गरीब रुग्णांसाठी 20 टक्के खाटा या राखीव असतात. त्यापैकी 10 टक्के खाटा निर्धन रुग्णांसाठी मोफत तर 10 टक्के खाटा गरीब रुग्णांसाठी ५० टक्के सवलतीच्या दरात असतात. राज्यात असे एकूण 476 हॉस्पिटल आहेत आणि तब्बल 10, 447 खाटा या त्यांच्यासाठी राखीव आहेत. राखीव ठेवलेल्या या खाटा आणि उपचार हा या गरीब-निर्धन रुग्णांचा हक्क आहे. जिथे ते कुणाकडूनही शिफारस न घेता सन्मानाने उपचार घेऊ शकतात.

या संकेतस्थळावर माहिती

विशेष म्हणजे धर्मादाय आयुक्तालयाच्या https://charity.maharashtra.gov.in/mr-in/ या वेबसाईटवर ही माहिती उपलब्ध असते. प्रत्येक जिल्ह्यानुसार तिथल्या ट्रस्ट हॉस्पिटलची यादी आणि उपलब्ध असणाऱ्या खाटांची संख्या पाहता येते. तसेच संबंधित जिल्ह्यातील धर्मादाय आयुक्तांचे संपर्क दिलेले असतात. काहीही अडचण किंवा तक्रार असल्यास त्यांना संपर्क करता येऊ शकतो. निर्धन रुग्णांसाठी मोफत उपलब्ध 10 टक्के खाटा - 5354 तर गरीब रुग्णांसाठी 50 टक्के सवलतीच्या दरात उपलब्ध 10 टक्के खाटा - 5093 आहे.

अशी मिळेल माहिती

वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर मुखपृष्ठ पान येते. या पानावर ‘बेड उपलब्धता पहा’ यावर क्लिक करावे. त्यानंतरच्या पानावर आपला जिल्हा निवडा आणि ‘शोध’ टॅबवर क्लिक केल्यास रुग्णालयाची यादी दिसेल. आपल्याला आवश्यक असणाऱ्या हॉस्पिटलच्या नावापुढील ‘बेड उपलब्धता’ टॅबवर क्लिक केल्यावर मोफत व सवलतीच्या दरात उपलब्ध असणाऱ्या बेडची संख्या दिसेल. निर्धन रुग्णासाठी उत्पन्न मर्यादा – वार्षिक 85 हजार रुपये हवी. यात पूर्णपणे मोफत वैद्यकीय उपचार केला जातो. तर दुर्बल घटकातील/गरीब रुग्णासाठी उत्पन्न मर्यादा – वार्षिक 1 लाख 80 हजार रुपये आवश्यक आहे. यात सवलतीच्या दरात वैद्यकीय उपचार (50 टक्के सवलत) केला जातो.

माहिती अपडेट होत नाही!

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गरीब-निर्धन रुग्णांसाठी जीवनदायिनी ठरणारी ही योजना लागू करण्यात आलेलीआहे. त्यानुसार वेबसाईटवर एकूण खाटांपैकी किती खाटा उपलब्ध आहेत, याची माहिती प्रत्येक ट्रस्ट हॉस्पिटलने दररोज अपडेट करणे आवश्यक आहे. मात्र बहुतांश हॉस्पिटल याबाबत उदासीन आहेत. एकूण खाटांची संख्या वेबसाईटवर दिसत असली, तरीही त्यातील किती खाटा शिल्लक आहेत याची माहिती अद्ययावत करत नाहीत. दर दिवशी ही माहिती अपडेट झाली तर ऐनवेळी रुग्णांची व त्यांच्या कुटुंबियांची होणारी फरफट टाळता येऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...