आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सारस पक्ष्यांच्या संवर्धनासाठी पुढाकार:वन खात्याकडून धान उत्पादक शेतमालकांना दरवर्षी मिळणार 10 हजार

नागपूर6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोंदिया जिल्ह्याचे वैभव असलेल्या सारस पक्ष्याच्या संवर्धनासाठी आणि त्यांच्यासाठी घरटे बांधणाऱ्या “सारस मित्रांना” प्रोत्साहन देण्यासाठी राज्याच्या वन विभागाने पुढाकार घेतला आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या संदर्भात बैठक घेत पक्ष्यांचे संवर्धन करणाऱ्या शेतमालकाला दरवर्षी किमान १० हजार रुपये प्रोत्साहनात्मक रक्कम देण्याचा निर्णय मुंबई येथील बैठकीत घेतला. राज्यात सारस पक्षी फक्त भंडारा व गोंदिया जिल्ह्यातच आढळतो.

गोंदिया जिल्ह्यातील व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठानच्या सन २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात खासगी जमिनीवर सारस पक्ष्यांनी घरटे बांधल्यावर घरट्यांचे व पक्ष्यांचे संवर्धन करणाऱ्यास प्रोत्साहनात्मक रक्कम देण्याची तरतूद केली होती. सारसचे घरटे असलेल्या शेत मालकास व लागून भातशेती करणाऱ्या शेतमालकांना दर वर्षी किमान १० हजार रुपये प्रोत्साहनात्मक रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सारस पक्ष्यांचा विणीचा हंगाम संपून सारसपक्षी पिलांना दुसरीकडे घेऊन जाईपर्यंत शेतमालकाने सारस पक्ष्यांना संरक्षण देण्यात यावे; याबाबत पाहणीनंतर खात्री झाल्यावर ही रक्कम देण्यात येईल.

गोंदिया जिल्ह्यातील वाघ नदी तसेच गोंदिया व भंडारा जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या वैनगंगा नदीचे खोरे व त्यालगत असलेल्या भाताच्या शेतीत तसेच तलावामध्ये सारस पक्ष्यांचे अस्तित्व आहे. सारस हा स्थानिक स्थलांतर करणारा पक्षी असून दलदल व पाणथळ पर्यावरण हा त्याचा मुख्य अधिवास आहे. हा पक्षी या दोन जिल्ह्यावरील भूभाग तसेच मध्य प्रदेशातील बालाघाट परिसरात आढळतो. सारस पक्षी गोंदिया जिल्ह्याचे वैभव व सौंदर्याचे प्रतिक आहे. सारस पक्ष्यांचे संरक्षण व संवर्धनाकरिता शेतकरी, पक्षी प्रेमी, विद्यार्थी यांच्यासह वन विभाग प्रयत्न करत आहे.

एकाच जोडीदाराबरोबर सहजीवन ः रामायणासह पुराणातही सारस पक्ष्याचा उल्लेख आढळताे. सारस नेहमी जोडीने राहतो आणि फिरतो. एकाच जोडीदाराशी एकनिष्ठ असलेला सारस जोडीदाराला मरेपर्यंत सोडत नाही. दोघांपैकी एकाचा मृत्यू झाला तर दुसरा अन्न पाणी वर्ज्य करून प्राण त्यागतो. सारस धानाच्या शेतात घरटे करून त्यात अंडी घालतात. या ३० दिवसांच्या कार्यकाळात शेतकरी व सारस यांच्यात एक वेगळे नाते पाहावयास मिळते. सारस पक्षी शेतात अंडी घालण्याचा फायदा शेतमालकालाही होतो. पिकावरील विविध कीटक खात असल्याने धान्यावर कोणतीही रोगराई येत नाही.

वन खात्याने पुढील वाटचाल ठरवावी ^सारस पक्ष्याच्या संवर्धनाची गरज असताना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेत घोषणा केली. त्याचे स्वागत आहे. सेवा संस्था आणि शेतकरी गेली अनेक वर्षे सारस संवर्धनासाठी काम करत आहे. ही घोषणा म्हणजे त्या प्रयत्नांचे फलित आहे. वन खात्याने या स्टेक होल्डर्ससोबत चर्चा करून पुढील वाटचाल ठरवावी. - सावन बाहेकर, अध्यक्ष, सेवा संस्था, गोंदिया.

बातम्या आणखी आहेत...