आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआर्वी येथे अल्पवयीन मुलीचा गर्भपात केल्याप्रकरणी महिला डॉक्टरच्या अटकेनंतर तपासाअंती संबंधित रुग्णालयाच्या आवारातील बायोगॅस टाकीमध्ये भ्रूणांच्या ११ कवट्या व ५४ मांसाचे तुकडे सापडले आहेत. त्यामुळे अशा कित्येक भ्रूणहत्या झाल्याचा संशय असून डॉक्टर महिलेस मदत करणाऱ्या दोन परिचारिकांनाही पोलिसांनी अटक केल्याने या प्रकरणी अटक झालेल्यांची संख्या ५ झाली आहे.
आर्वी बसस्थानकाजवळ असलेल्या कदम रुग्णालयात गर्भवती महिलांचे अवैधरीत्या गर्भपात केले जात होते. अल्पवयीन मुला-मुलीच्या प्रेमप्रकरणात गर्भधारणा झालेल्या मुलीचा कदम रुग्णालयात गर्भपात करण्यात आल्याची तक्रार पीडितेच्या आईकडून ९ जानेवारी रोजी पोलिसांत दाखल झाल्यानंतर डॉ. रेखा कदम यांच्यासह अल्पवयीन मुलाच्या आई-वडिलांना अटक करण्यात आली. रुग्णालयातील सोनोग्राफी मशीन व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. यानंतर पोलिसांनी रुग्णालयाच्या आवारात तपास सुरू केला तेव्हा या रुग्णालयाच्या माध्यमातून एक नव्हे, अनेक अवैध गर्भपात करण्यात आले असल्याचे स्पष्ट होत आहे.
याप्रकरणी सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी पोलिस अधीक्षक डॉ. प्रशांत होळकर यांच्याकडे केली आहे. आरोपी डॉक्टर महिलेचे सासू-सासरे दोघेही डॉक्टर असून पती उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर आहेत. त्यामुळे भ्रूणहत्येचे हे मोठे रॅकेट असावे, अशी शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे.
बायोगॅसच्या टाकीत अवयव
याप्रकरणी पोलिसांनी कसून तपास केल्यानंतर रुग्णालयाच्या आवारातील बायोगॅस टाकीमध्ये भ्रूणांच्या ११ कवट्या व मांसाचे ५४ तुकडे आढळून आले. मांसाचे तुकडे व कवट्या नागपूर येथील रासायनिक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आल्या आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.