आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताडोबा व्याघ्र प्रकल्पात फुलपाखरांच्या 134 प्रजाती ​​​​​​​:प्रथिने, क्षारांचे स्त्रोत असणाऱ्या देशी वनस्पतींची लागवड करण्याची शिफारस

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूरपासून 140 किमी अंतरावरील चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्प आता फक्त वाघच नाही तर फुलपाखरांसाठीही ओळखला जात आहे. दहा वर्षांच्या अभ्यासावर आधारित नुकत्याच तयार केलेल्या अहवालात या प्रकल्पात 6 कुळातील फुलपाखरांच्या 134 प्रजाती असल्याचे एका अभ्यासात दिसून आले आहे.

ताडोबा व्याघ्र प्रकल्पात 2008-2010 दरम्यान पहिले सर्वेक्षण सेलू येथील डॉ. आर. जी. भोयर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सेलू. (विद्याभारती कॉलेज, सेलू.) प्राणीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. आशिष टिपले यांनी केले होते, त्यात फुलपाखरांच्या 111 प्रजातींची नोंद करण्यात आली होती.

सध्याचा अभ्यास 2011 - 2021 दरम्यान विद्याभारती महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. आशिष टिपले आणि टीएटीआरचे विभागीय अधिकारी शतानिक श्यामसुंदर भागवत यांनी केला आहे. त्यांचा शोधनिबंध आंतरराष्ट्रीय जर्नल ऑफइन्सेक्ट बायोडायव्हर्सिटी अँड सिस्टेमॅटिक्स मध्ये ही प्रकाशित झाला आहे.

आशिष टिपले यांनी याबाबत असे सांगितले की, सहसा ओळखल्या जात नसलेल्या प्रजातींचा अभ्यास करण्याची गरज आहे. फुलपाखरे परागीकरणासाठी महत्त्वाची असतात. कारण ती मकरंद पिण्यासाठी वेगवेगळ्या फुलांना भेट देतात. त्यामुळे फुलपाखरु हा पर्यावरणाचा एक महत्त्वाचा घटक आहे. पर्यावरणातील लहान लहान बदल या कीटकांना जाणवतात आणि निवासस्थान, वातावरणातील तापमान आणि हवामानातील बदल यांचा थेटपरिणाम त्यांच्यावर होतो. भरपूर फुलपाखरे हे उत्तम पर्यावरणाचे द्योतक आहे.

अभ्यासात असे दिसून आले आहे की बागा, वृक्षारोपण केलेली ठिकाणे आणि कुरणे यासारख्या माणसाचा वावर आहे. अशा ठिकाणी फुलपाखरे फार कमी आढळली. पावसाळ्यापासून हिवाळ्याच्या सुरुवातीपर्यंत फुलपाखरं जास्त प्रमाणात आढळली, परंतु त्यानंतर उन्हाळ्याच्या सुरुवातीस (मार्च) त्यात घट झाली. खाद्य वनस्पतींची अनुपलब्धता आणि पाण्याची कमतरता हे या घसरणीचे कारण असू शकते. निरोगी आणि उत्तम अनुवांशिक वैविध्य असणाऱ्या फुलपाखरांच्या प्रजाती टिकून राहण्यासाठी विदेशी खाद्य वनस्पतीं ऐवजी विविध प्रथिने आणि क्षारांचे स्त्रोत असणाऱ्या देशी वनस्पतींची लागवड करणे देखील या अभ्यासात सुचवले आहे.

भागवत यांनी असे सांगितले की, ताडोबा राष्ट्रीय उद्यानाच्या नोंदीत 27 नवीन प्रजातींची भर घालून आता फुलपाखरांच्या एकूण 134 प्रजातींची नोंदकरण्यात आली. अभ्यासात आढळेल्या एकूण 60 प्रजातीसहज आढळणाऱ्या होत्या, 34 प्रजाती सामान्य होत्या, 9 वारंवार आढळणाऱ्या होत्या, 19 दुर्मिळ होत्या आणि 12 अत्यंत दुर्मिळ होत्या. या नोंदविलेल्या सुमारे 12 प्रजाती भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अन्वये संरक्षित आहेत. निम्फॅलिडेकुळातील 43 प्रजाती या अभ्यासात आढळल्या असून त्यापैकी 4 प्रजातींची ताडोबात पहिल्यांदाच नोंद झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...