आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुप्त बैठक:देवेंद्र फडणवीस-नाना पटोले यांच्यात 15 मिनिटे बंदद्वार चर्चा, पटोलेंच्या भाजप प्रवेशाची राजकीय वर्तुळात चर्चा

भंडारा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील महाविकास आघाडी सरकार स्थापनेपासून, तर शिंदे-फडणवीस सरकारच्या स्थापनेनंतरही सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात शाब्दिक शीतयुद्ध बघायला मिळत आहे. अशात सोमवारी भंडाऱ्यात नियोजन समितीच्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री फडणवीस आणि नाना पटोले यांनी बंद दाराआड १५ मिनिटे गुफ्तगू केले. दोघांच्या गुप्त बैठकीनंतर सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे.

उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे भंडारा जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी आली आहे. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात नियोजन समितीची सभा पार पडली. या सभेला उपमुख्यमंत्री तथा भंडाऱ्याचे पालकमंत्री फडणवीस यांच्यासह काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले, आ. परिणय फुके, आ. नरेंद्र भोंडेकर, आ. राजू कारेमोरे आणि खा. सुनील मेंढे यांच्यासह अधिकारी आणि जिल्हा परिषद पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. या सभेनंतर कुणालाही कळायच्या आत नाना पटोले जिल्हा नियोजन अधिकारी यांच्या कक्षात पोहोचले. त्यांच्या पाठोपाठ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही त्या कक्षात पोहोचले. फडणवीस आणि पटोले राजकारणात दोघेही एकमेकांचे विरोधक असले तरी खासगी आयुष्यात ते चांगले मित्र असल्याची कुजबूजही या निमित्ताने सुरू होती. साकोली विधानसभा क्षेत्राच्या विकासासाठी अतिरिक्त निधी मागितला असावा का? राज्यातील राजकीय चाणक्य म्हणून नवीन ओळख निर्माण करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर भाजपचे दिल्लीतील नेतेही खुश असल्याने भविष्यात नाना पटोले भाजपत प्रवेश तर करणार नाही ना? अशा उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. फडणवीस आणि नाना पटोले यांच्या बंदद्वार चर्चेची कल्पना नियोजन विभागातील कुठल्याच अधिकाऱ्यांनाही आली नाही, हे विशेष. भविष्यात त्याचे पडसाद दिसू शकतात.

फडणवीसांनी सर्वांना कक्षाबाहेरच थांबवले बैठकीनंतर फडणवीस उठल्यानंतर त्यांच्यामागे त्यांची सुरक्षा यंत्रणा आणि आ. परिणय फुके हेही निघाले. मात्र, फडणवीस यांनी या सर्वांना कक्षाच्या बाहेर थांबवून नाना पटोले यांच्याशी सुमारे १५ मिनिटे बंदद्वार चर्चा केली. हा प्रकार लक्षात येताच अनेकांच्या भुवया उंचावल्या. राज्यातील राजकारणात महत्त्वाची भूमिका निभावणारे दोन विविध पक्षांतील नेते एकत्र आल्याचा प्रकार भंडाऱ्यात घडला. या दोघांमध्ये कुठल्या विषयावर चर्चा झाली असावी याबाबत केवळ तर्कवितर्क लावले जात आहे. दोघे भेटणार होते कुणालाच माहिती नव्हते.

बातम्या आणखी आहेत...