आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्रात अंड्यांचा तुटवडा निर्माण झाला असल्याने पशुसंवर्धन विभागाला इतर राज्यांमधून अंड्यांची खरेदी करावी लागत आहे. अंड्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी राज्य सरकार सध्या नव्या योजना आखत आहे. योजना यशस्वी झाल्यास अंड्याचा तुटवडा होणार नाही, अशी माहिती पशुसंवर्धन विभागाचे प्रभारी अतिरिक्त आयुक्त डाॅ. शीतलकुमार मुकणे यांनी दिली.
सध्या महाराष्ट्रात रोज ७५ लाख अंड्यांचे शाॅर्टेज आहे. राज्यात दररोज २ कोटी २५ लाख अंडी खपतात. सध्या दररोज साधारणत: ७५ लाख अंड्याचा तुटवडा जाणवत आहे. मात्र त्याचा फारसा परिणाम दरवाढीत झालेला नाही. कारण सध्या राज्यातील तुटवडा लक्षात घेता कर्नाटक, तेलंगण आणि तामिळनाडूमधून अंडी खरेदी केली जात असल्याचेही मुकणे यांनी सांगितले.
तामिळनाडूतून अंडी मागितल्यास फार तर १५ ते २० पैशांचा फरक पडतो. त्यामुळे दर वाढीवरही परिणाम होत नाही असे मुकणे यांनी सांगितले. राष्ट्रीय पोषण संस्थेच्या मानकांनुसार राज्यात वर्षाला प्रतिमाणसी १८० अंड्यांची आवश्यकता असते. परंतु, सध्या राज्यात प्रतिमाणसी केवळ ५२ अंडी उपलब्ध आहे. तर राष्ट्रीय सरासरी ९० अंड्यांची आहे. अंड्याचा हा तुटवडा इतर राज्यांतून अंडी मागवून पूर्ण केला जातो..
कृषी विभागामार्फत राबवणार योजना
उत्पादन वाढवण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने प्रत्येक जिल्ह्याला २१ हजारांच्या अनुदानित दराने ५० व्हाईट लेघॉर्न कोंबड्यांचे १ हजार पिंजरे देण्याची योजना आखली आहे. यासंबंधी पशुसंवर्धन विभागाने राज्य सरकारने प्रस्ताव पाठवला आहे. मात्र ही योजना कृषी विभागाच्या एका योजनेत समावेश करून अंमलात येणार आहे. त्या नंतर राज्यातील अंड्याचा तुटवडा कमी होईल आणि इतर राज्यांतून अंडी मागवावी लागणार नाही, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.