आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औष्णिक वीज निर्मिती केंद्रात दुर्घटना:खापरखेडा येथे कोल स्टेकर पलटून 2 कंत्राटी कामगारांचा मृत्यू

नागपूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

खापरखेडा औष्णिक वीज निर्मिती केंद्रात कोल स्टेकर पलटून दोन कामगारांचा बुधवारी मध्यरात्री मृत्यू झाला. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. वीज केंद्राच्या ५०० मेगावाॅट संचात बुधवारी मध्यरात्री कोसळा वाहून नेणारा कोल स्टेकर अचानक पलटला. त्या खाली दबून या कामगारांचा मृत्यू झाला. चनकापूर येथील प्रवीण शेंडे, संतोष मेश्राम ही मृतकांची नावे आहेत. दोघेही कंत्राटी कामगार असल्याचे समजते.

वारंवार अपघात

खापरखेडा औष्णिक वीज निर्मिती केंद्रात नेहमीच अपघात होतात. वारंवार अपघात होऊनही वीज निर्मिती केंद्राचे व्यवस्थापन सुरक्षा उपायांबाबत गंभीर नसल्याचे दिसून येते. यापूर्वीही २३ मार्च २०२२ रोजी नागपुरातील खापरखेडा औष्णिक विद्युत प्रकल्पात कन्व्हेअर बेल्टमध्ये अडकून कंत्राटी कामगाराचा मृत्यू झाला होता. विद्युत केंद्रातील टीपी 103 क्रशर हाऊस परिसरात घडलेल्या घटनेत अमोल हेमराज जाने यांना जीव गमवावा लागला होता. ते एका खासगी कंपनीच्या वतीने कंत्राटी कामगार म्हणून सेवा देत होते.

राखेचा बंधारा फुटून शेतीचे नुकसान

खापरखेडा औष्णिक वीज केंद्रातून एका पाईपलाईनच्या माध्यमातून औष्णिक वीज केंद्रातील राख मिश्रित पाणी वीज केंद्राच्या वारेगाव येथील राखेच्या बंधाऱ्यात पोहोचवले जाते. मध्यंतरी या पाईपलाईनमधून लिकेज होत होते. जुलैमध्ये राखेचा बंधारा फुटल्याने संपूर्ण परिसरासह शेतात राखेचे पाणी शिरल्याने हजारो हेक्टरमधील शेतीचे नुकसान झाले. महावितरणने नुकसानग्रस्तांना थातुरमातुर मदत करून वेळ मारून नेली होती. राखमिश्रित पाणी परिसरातील नाल्यांमध्ये आणि अखेरीस कोलार नदीमध्ये मिसळून पिण्याचा पाण्याचा प्रश्नही गंभीर झाला होता. कोलार नदीचे पाणी पुढे कन्हान नदीमध्ये वाहून जाते. खापरखेडा औष्णिक वीज निर्मिती केंद्रात कंत्राटी कामगार मोठ्या संख्येने काम करतात. अनेकदा या कामगारांना धोकादायक परिस्थितीतही काम करावे लागते. मात्र त्यांच्या सुरक्षेच्या बाबतीत हयगय केली जात असल्याचे अनेक घटनांमध्ये समोर आले आहे.

बातम्या आणखी आहेत...