आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:एकट्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात 250 वाघांची वस्ती; घनदाट जंगलातील 110 पैकी 66 गावांचे केले पुनर्वसन

नागपूर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यातील वाघांच्या कृत्रिम स्थलांतरासाठी स्थापन समितीने केल्या सूचना

राज्यात एकट्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात कोअर आणि बफर झोन मिळून सुमारे २५० वाघ आहेत. वाढत्या संख्येमुळे अधिवास कमी पडायला लागल्याने येथील वाघ नव्या अधिवासाच्या शोधात आहे. वाघांना नवा अधिवास मिळावा आणि त्यांचे पुनर्वसन व्हावे, यासाठी घनदाट जंगलातील गावांचे पुनर्वसन हा दीर्घकालीन असला तरी उत्तम पर्याय आहे. आतापर्यंत ११० पैकी ६६ गावांचे पुनर्वसन झाल्याची माहिती राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर यांनी “दिव्य मराठी’ला दिली. २०१८ च्या व्याघ्र जनगणनेत राज्यात ३१८ वाघ होते. त्यातील १६० वाघ चंद्रपूर जिल्ह्यात होते. आता ही संख्या २५० च्या आसपास आहे.

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सुमारे ५० वाघांचे इतर जंगलात स्थलांतरण करण्यासाठी नेमलेल्या समितीने आपला अहवाल सादर केला आहे. समितीने १०० सूचनांसह घनदाट जंगल परिसर, भ्रमणमार्ग, दाट व बाहेरचे जंगल आणि वाघ नसायला पाहिजे परंतु असलेले खाणींचे परिसर असे चार झोन करावे, असे सुचवले आहे. हा अहवाल तपासून टिपणीसह आठवडाभरात सरकारला सादर करण्यात येईल. दरम्यान, मानव वन्यजीव संघर्षाच्या घटना वाढल्याने वाघांच्या स्थलांतरणाचा प्रश्न ऐरणीवर आला. पुनर्वसन ही ग्रामस्थांसाठी भावनिक गुंतागुंतीची प्रकिया आहे. ते ऐच्छिक आहे. पहिल्या पद्धतीत गावकऱ्यांना १० लाख रुपये िदले जातात. दुसऱ्या पद्धतीत संपूर्ण पुनर्वसन वनखाते करते. अजूनही ४४ गावांचे पुनर्वसन बाकी आहे, असे काकोडकर यांनी सांगितले.

“वॉकर’चा ३ हजार किमी प्रवास : अलीकडे जोडीदार तसेच स्वत:च्या टेरीटोरीच्या शोधात नर वाघाचे स्थलांतरण होत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यातील सी-१ वाघाने थाेडाथोडका नव्हे तर तीन हजार किमीचा प्रवास करत बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्याचा परिसर अधिवासासाठी निवडला. त्याने या दरम्यान आठ जिल्हे ओलांडल्याने त्याचे वाॅकर असे नामकरण करण्यात आले. सध्या या वाघाचा ठावठिकाणा नाही.

अभयारण्याचे क्षेत्रफळ वाढवणे गरजेचे
वाघांची वाढती संख्या हे व्याघ्र संरक्षण कार्याचे यश आहे. मात्र, यात वाघांची शिकार किंवा माणसाचा बळी जाऊ नये म्हणून प्रयत्न आवश्यक ठरतात. यासाठी लहान व्याघ्र अभयारण्याचे क्षेत्रफळ वाढवले पाहिजे. सर्व व्याघ्र अधिवसात शिकारीच्या घटनांना गांभीर्याने घेणे, संचार मार्गात काँझरवासीसारखे लोकाभिमुख संवर्धन-पर्यटन उपक्रम हाती घेणे, तातडीने गरजेचे आहे. - किशोर रिठे, माजी सदस्य, केंद्रीय वन्यजीव मंडळ, भारत सरकार.

बातम्या आणखी आहेत...