आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फटका:राज्यभरात 31 लाख शेतकरी पीएम किसान हप्त्यापासून वंचित राहणार? बँक खाते आधारशी न जोडल्याचा परिणाम

नागपूर21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आधार जोडणी आणि केवायसी नसल्यामुळे राज्यात ३१ लाख ८३ हजार शेतकऱ्यांवर पीएम किसान हप्त्यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. यामध्ये १८ लाख ९६ हजार ९५३ शेतकऱ्यांनी अजूनही केवायसी पूर्ण केलेली नसून १२ लाख ८६ हजार ६८७ शेतकऱ्यांनी त्यांचे बँक खाते आधारशी जोडलेले नाही. पीएम किसानसाठी राज्यात १ कोटी १६ लाख ८८ हजार ८७१ शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे. त्यापैकी ९८ कोटी ०५ लाख २७५ हजार शेतकरी योजनेसाठी पात्र ठरल्याची माहिती पी. एम. किसान योजनेचे राज्यस्तरीय अंमलबजावणी प्रमुख सुनील चव्हाण यांनी दिली आहे.

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबाला २००० रुपये प्रतिहप्ता याप्रमाणे ६००० रुपये प्रतिवर्षी लाभ देण्यात येतो. योजनेच्या १४ व्या हप्त्याचा लाभ मे महिन्याच्या शेवटच्या किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात जमा होणार आहे. केंद्र शासनाने १४ व्या हप्त्याचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थींनी त्यांचे बँक खाते आधार क्रमांकाशी जोडणे बंधनकारक केले आहे. राज्यात सद्य:स्थितीत १२.९१ लाख लाभार्थींची बँक खाती त्यांच्या आधार क्रमांकाला जोडलेली नाहीत. त्यामुळे या लाभार्थीच्या खात्यात १४ व्या हप्त्याचा लाभ जमा होणार नाही.

लाभार्थींना त्यांचे बँक खाते आधार क्रमांकाशी जोडण्याची सुविधा त्यांच्या गावातील पोस्ट मास्तर यांच्यामार्फत उपलब्ध करण्यात आली आहे.

यासाठी आधार कार्ड, मोबाइल क्रमांक या कागदपत्रांच्या आधारे आपल्या गावातील पोस्ट विभागाचे कर्मचारी यांच्यामार्फत इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत (आयपीपीबी) मध्ये खाते उघडावे. सदरचे बँक खाते आपल्या आधार क्रमांकाशी ४८ तासांत जोडले जाईल. सदरची पद्धत कोणत्याही अतिरिक्त कागदपत्रांशिवाय करता येणार असल्याने अत्यंत सोपी व सुलभ आहे. आयपीपीबीमध्ये बँक खाते सुरू करण्याची सुविधा आपल्या गावातील पोस्ट कार्यालयातच उपलब्ध असल्याने लाभार्थींना इतरत्र जाण्याची गरजही पडणार नाही.

बियाण्यांची कमतरता नको : सत्तार
आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते, किटकनाशकांची अजिबात कमतरता भासणार नाही याची दक्षता घ्यावी; बियाणे, कृषि निविष्ठांच्या गुणवत्तेवर लक्ष द्यावे, असे निर्देश राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी सोमवारी पुण्यात दिले.

दृष्टिक्षेपात पीएम किसान
एकूण नोंदणीकृत शेतकरी १,१६,८८,८७१
एकूण पात्र शेतकरी ९८,०५,२७५
एकूण केवायसी प्रलंबित १८,९६,९५३
आधार सीडेड नसलेले १२,८६,६८७
सर्व प्रलंबित लाभार्थींनी त्यांचे बँक खाते उघडण्याचे आवाहन

गावपातळीवर राबवण्यात येत आहे मोहीम
पीएम किसान योजनेतील प्रलंबित लाभार्थींची बँक खाती आयपीपीबीमध्ये उघडून ती आधार क्रमांकाला जोडण्यासाठी राज्याच्या आयपीपीबी कार्यालयास गावनिहाय याद्या उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याप्रमाणे गावातील पोस्ट मास्टर या लाभार्थींना संपर्क करून आयपीपीबीमध्ये बँक खाती सुरू करतील. योजनेच्या १४ व्या हप्त्याच्या लाभासाठी आधार संलग्न बँक खाते अनिवार्य केलेले असल्याने आयपीपीबीमार्फत १ मे २०२३ ते १५ मे २०२३ या कालावधीत यासाठी गावपातळीवर सर्वत्र मोहीम राबवण्यात येत आहे. आयपीपीबीमार्फत आयोजित या मोहिमेमध्ये राज्यातील सर्व प्रलंबित लाभार्थींनी त्यांचे बँक खाते उघडावे, असे आवाहन राज्याचे कृषी आयुक्त तथा पी. एम. किसान योजनेचे राज्यस्तरीय अंमलबजावणी प्रमुख सुनील चव्हाण यांनी केले आहे.