आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूर जिल्ह्यात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव मदत मिळणार:नुकसान भरपाईसाठी 339 कोटींची जिल्हाधिकाऱ्यांची मागणी

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यात झालेल्या अतिवृष्टीच्या संदर्भातील पंचनामे पूर्ण झाले असून कृषीमंत्र्यांनी सुचविल्याप्रमाणे ऑगस्ट अखेरपर्यंतचा अहवाल जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटणकर यांनी सादर केला असून यामध्ये नुकसान भरपाईसाठी 339 कोटींची मागणी करण्यात आली आहे.

गेल्या तीन महिन्यात झालेल्या अतिवृष्टी संदर्भात गाव पातळीवर तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक यांनी केलेल्या संयुक्त सर्वेक्षणानुसार ही आकडेवारी पुढे आली आहे. यावर्षी नागपूर जिल्ह्यात जून ते ऑगस्ट या तीन महिन्यात अतिवृष्टीमुळे 2 लाख 67 हजार 92 शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील 2 लाख 42 हजार 817 हेक्टर क्षेत्रातील पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. शासनाच्या नव्या निर्णयानुसार नुकसान भरपाईची मर्यादा वाढवण्यात आली असल्याने जिल्ह्याला 339 कोटी रुपयांची आवश्यकता असल्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडून राज्य शासनाला पाठवण्यात आलेला आहे.

नव्या सरकारने नुकसान भरपाई संदर्भात भरीव मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वीच्या शासन निर्णयानुसार दोन हेक्टर पर्यंत नुकसान झालेल्यांना मदत दिली जात होती. मात्र 22 ऑगस्ट 2022 च्या सुधारित शासन निर्णयानुसार नुकसान भरपाईची मर्यादा वाढवून तीन हेक्टरपर्यंत करण्यात आली आहे. नव्या शासन निर्णयानुसार जिरायती पिकांसाठी 3 हेक्टर पर्यंत प्रतिहेक्टरी 13 हजार 600 तर बागायती पिकांसाठी 3 हेक्टर पर्यंत प्रतिहेक्टरी 27 हजार रुपये, बहुवार्षिक पिकांसाठी 3 हेक्टर पर्यंत प्रतिहेक्टरी 36 हजार रुपये मदत देय आहे. त्यामुळे जून, जुलै व ऑगस्ट अशा तीन महिन्यांचे सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी तहसिलदारांना दिले होते.

तालुकास्तरावरून आलेल्या अधिकाऱ्यांच्या अहवालामध्ये तालुकानिहाय नुकसान भरपाई पुढील प्रमाणे सुचविण्यात आली आहे. यामध्ये नागपूर ग्रामीण 11 कोटी, हिंगणा 23 कोटी, मौदा 71 लाख, कामठी 10 कोटी, काटोल 47 कोटी, नरखेड 42 कोटी, सावनेर 36.90 कोटी, कळमेश्वर 30.79 कोटी, रामटेक 5 कोटी, पारशिवनी 18 कोटी, उमरेड 35 कोटी, भिवापूर 25 कोटी, कुही 31 कोटी अशाप्रमाणे आहे. नुकसानीच्या आकडेवारी मध्ये सर्वाधिक बाधित क्षेत्र हे काटोल, नरखेड, कळमेश्वर, उमरेड या तालुक्यातील आहे. शासनाचा प्रस्ताव गेला असून यासंदर्भात पाठपुरावा सुरू करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...