आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अपघात:वर्ध्यातील स्टील कंपनीत गरम राख अंगावर पडून 38 कामगार जखमी

वर्धाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 38 कामगार गंभीर जखमी, 28 कामगारांवर वर्ध्याच्या रुग्णालयात उपचार सुरू

शहराजवळ असलेल्या भूगाव येथील उत्तम गलवा स्टील प्लँटमध्ये कामगारांच्या अंगावर गरम राख पडल्याने ३८ कामगार गंभीर जखमी झाले असून, दोन जणांना नागपूर येथील ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हा अपघात बुधवारी सकाळी घडला.

भूगाव येथील स्टील प्लँट वार्षिक देखभालीसाठी पहाटे बंद करण्यात आला होता. फरनेस पूर्णपणे बंद झाल्यावर फरनेसमधील राख बाहेर काढण्याचे काम ५० कामगार करत होते. अचानक गरम हवेसोबत काही कण उडाल्याने ३८ कामगार गंभीर जखमी झाले. यातील २८ कामगारांना सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा ग्रामीण रुग्णालयात तर १० कामगारांना सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. गंभीर जखमी असलेले कामगार इंद्रजित राम,अभिषेक बऊमिक, सूरज सनाबोयिना, विनोद पांडे, श्याम किशोर पाल व मनोजकुमार पाल या कामगारांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना नागपूर येथील ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनेनंतर जिल्हाधिकारी विवेक भीमनवार, पोलिस अधीक्षक प्रशांत होळकर, जि.प.चे मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचिन ओंम्बासे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सचिन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले, प्रभारी तहसीलदार स्वप्निल दिगलवार, सावंगीचे ठाणेदार रेवचंद सिंगणजुडे, शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार सत्यवीर बंडीवार आदींनी पाहणी केली.

सुरक्षा रक्षकांची पत्रकारांसोबत गैरवर्तणूक : कंपनीमधील कामगारांवर गरम राख पडली असून त्यात कामगार जखमी झाले असल्याची माहिती मिळताच वृत्तसंकलन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांसोबत सुरक्षा रक्षकांनी गैरवर्तणूक केल्याने पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे कंपनीविरोधात उपस्थितांचा रोष दिसून आला.

अपघातातील जखमींची नावे : पुष्पेंद्र पटेल, योगेंद्र निर्मलकर, कमलेश भाटिया, गिरिधर निर्मलकर, मृत्युंजय महंते, दिलीप साहू, मनोज यादव, विश्वजित, साईकुमार श्रीराम, आदित्य होळकर, हरिराम दुर्गे, रमाकांत पाटील, मंगेश चंदनखेडे, चंद्रकांत पुष्टी, अशोककुमार पाटील, सनी मिंज, सूरज सनाबोयिना, इंद्रजित राम, अभिषेक बऊमिक, श्रीकांत पोटदुखे, बिपिन सेन, श्याम पाल, विनोद पांडे, अमित पटेल, कुंदन तराळे, राहुल इंदूर.

अपघाताची चौकशी कामगार अधिकाऱ्यांमार्फत होणार : अपघातात ३८ कामगार भाजले गेले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची चौकशी कामगार अधिकाऱ्यांमार्फत करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत. - विवेक भीमनवार, जिल्हाधिकारी, वर्धा

दोषींवर कडक कारवाई : पालकमंत्री सुनील केदार
अपघात गंभीर स्वरूपाचा असून या अपघातात जखमी झालेल्या कामगारांना तातडीने वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश पालकमंत्री सुनील केदार यांनी दिले. तसेच या अपघाताला जे कुणी जबाबदार असतील त्यांच्यावर कडक कारवाई करावी, असे निर्देशही त्यांनी संबंधितांना दिले.

जखमींना मदत देऊ : वार्षिक देखभाल-दुरुस्तीसाठी ब्लास फरनेस बंद करण्यात आले होते. अचानक गरम हवा आणि कण बाहेर आले. त्यात काही कामगार जखमी झाले आहे. जखमी झालेल्या कामगारांच्या कुटुंबीयांना कंपनीकडून सर्वतोपरी मदत केली जाईल. - आर. के. शर्मा, जनसंपर्क अधिकारी, उत्तम गलवा, भूगाव

बातम्या आणखी आहेत...