आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयसीआयसीआय बँकेची 39 लाखांनी फसवणूक:कंपनीचा संचालक असल्याचे फोनवर सांगितले; भामट्याचा शोध सुरू

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सेंट्रल बाजार मार्गावरील अॅग्रो स्क्वेअर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा संचालक असल्याचे सांगून भामट्याने आयसीआयसीआय बँकेची 39 लाख 85 हजार रुपयांनी फसवणूक केली. याप्रकरणी बजाजनगर पोलिसांनी मोबाईल धारकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. बँकेचे व्यवस्थापक विवेककुमार विजय चौधरी यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामदासपेठ येथील आयसीआयसीआय बँक शाखेत अॅग्रो स्क्वेअर प्रायव्हेट लिमिटेडचे खाते आहे. ही कंपनी प्रकाश वाधवानी यांच्या मालकीची आहे. 2 सप्टेंबर रोजी मोबाईल धारकाने विवेककुमार यांच्या मोबाइलवर 8470820947 या मोबाईलवरून संपर्क साधला.

रक्कम केली जमा

"मी प्रकाश वाधवानी बोलत आहे. काहींना मला पैसे द्यायचे आहेत. मी तुम्हाला त्यांच्या बँक खात्यांचे क्रमांक ई-मेल करतो. तुम्ही त्यामध्ये 36 लाख 85 हजार रुपये जमा करा. कार्यालयात याल तेव्हा तुम्हाला धनादेश देतो', असे मोबाईलधारकाने विवेककुमार यांना सांगितले. त्यानुसार विवेककुमार यांनी दिलेल्या तीन खात्यात 27 लाख 35 हजार रूपये जमा केले.

व्हाॅट्सअॅपवर परत मेसेज

तीन खात्यात 27 लाख 35 हजार रूपये जमा केल्या नंतर शाखा व्यवस्थापकाला परत त्याच मोबाईल क्रमाकांवरून व्हाॅट्सअॅप मेसेज आला. त्या नुसार परत एका खात्यावर 12 लाख 50 हजार रूपये जमा करण्यात आले. त्यानंतर बँकचे अधिकारी वाधवानी यांच्या कार्यालयात गेले असता, मी पैसे जमा करण्याबाबत सांगितले नसल्याचे वाधवानी यांनी अधिकाऱ्याला सांगितले. फसवणूक झाल्याने विवेककुमार यांनी बजाजनगर पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून मोबाईलधारकाचा शोध सुरू केला आहे.

12 जणांची फसवणूक

चोरटे फसवणुकीच्या वेगवेगळ्या पद्धती शोधून काढतात. त्यांच्या तऱ्हा पाहून पोलिसही चक्रावतात. लक्ष विचलीत करून, पैसे खाली पडल्याचे सांगत वा दाम दुप्पट करून देतो असे सांगत फसवणूक केली जाते. मे 2022 मध्ये नोकरी लावून देण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या टोळीला नागपूर ग्रामीण पोलिसांनी अटक केली होती. डब्ल्युसीएल आणि एसबीआयमध्ये नोकरीचे आमिष दाखवून कोट्यावधीची फसवणूक करण्यात आली होती. फसवणूक करणाऱ्या टोळीचा छडा लावून नागपूर ग्रामीण आर्थिक गुन्हे शाखेने भामट्यांना गजाआड केले होते. नागपूर जिल्ह्यातील 12 जणांची फसवणूक करण्यात आल्या प्रकरणी तिघांना गजाआड व्हावे लागले होते.

बातम्या आणखी आहेत...