आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरात राहणाऱ्या महिलांकडून गाव दंड आकारणार नाही:भामरागडच्या 400 जणींकडून कुर्माप्रथा न पाळण्याच्या शपथपत्रावर सह्या

नागपूर5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सत्याचे प्रयोग-२ हे शिबिर २३ ते ३० ऑक्टोबर दरम्यान भामरागडमध्ये संपन्न झाले. या शिबिरानंतर भामरागडमधील ४०० महिलांनी कुर्माप्रथा न पाळण्याच्या शपथपत्रावर सह्या केल्या. हे परिवर्तनच म्हणावे लागेल.

गडचिरोलीत काही आदिवासी समुदायात असणाऱ्या कुर्माप्रथेत सकारात्मक बदल व्हावेत यासाठी समाजबंधने एप्रिलमध्ये भामरागड तालुक्यातील १८ गावात पहिले आठ दिवसीय निवासी शिबिर घेतले होते. यावेळी त्यातील १४ गावांमध्ये हे दुसरे शिबिर घेण्यात आले. ऐन दिवाळीच्या काळात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अक्षरशः जनरलच्या डब्यातून प्रवास करत १३ जिल्ह्यातून समाजबंधचे एकूण २५ कार्यकर्ते स्वखर्चाने शिबिरात सहभागी झाले होते.

सात महिन्यांपूर्वी म्हणजे पहिल्या शिबिराच्या आधी कुर्माप्रथेमध्ये बदल करणं जितकं अवघड वाटत होतं तितकं ते नक्कीच नाही हे या शिबिरात समजलं. कुर्माघर म्हणजे पाळीच्या काळात महिलांनी घराबाहेर राहण्याची अस्वच्छ, अंधारी, असुरक्षित, लहानशी झोपडी. हेच आपलं जगणं आहे हे मान्य करून याविषयी आम्हा कार्यकर्त्यांसोबत बोलायचं सोडाच पण ऐकायला ही तयार नसणाऱ्या महिला आता याविरोधात उघडपणे पंच मंडळींसमोर बोलू लागल्या आहेत.

यावेळी खेळ, स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रबोधन करण्यात आले. मासिक पाळी आणि इतर सामाजिक विषयांवर निबंधलेखन, चित्रकला, वक्तृत्व अशा विविध स्पर्धा आयोजित करत किशोर आणि युवांना बोलतं करण्यात आलं. या सामाजिक प्रश्नांवर जनजागृती करत महिला आणि किशोर यांची गावागावातून प्रभातफेरी काढण्यात आली. कुर्माप्रथेवर नेमकं भाष्य करणारे नाटक दिवाळीनिमित्त असणाऱ्या कार्यक्रमात गावातील मुलींनी सादर केले.

या सर्व स्पर्धांमधील विजेते आणि सहभागी लोकांना बक्षीस म्हणून लोकांकडून देणगीत मिळालेले नवे कपडे तसेच शैक्षणिक साहित्य देण्यात आले. सहयोग सेतू या संस्थेने सर्व १००० कुटुंबांना देण्यासाठी दिलेळे बेसन लाडूही घरोघरी वाटण्यात आले. जवळपास ५०० युवक युवतींना कुर्मा व मासिक पाळीविषयी प्रश्न विचारून सर्वेक्षण ही करण्यात आले. त्यानुसार असे लक्षात आले कि कुर्माप्रथा बंद व्हावी असे सर्वांनाच वाटते पण गावाच्या भीतीने पुढाकार घ्यायला कोणी तयार होत नाही. म्हणून अशा परिवर्तनशील युवकांचे 'युवा आरोग्य मंडळ' स्थापन करून गावातील प्रश्नांवर त्यांच्यामार्फत एकजुटीने यापुढे कामं केले जाणार आहे.

शेवटच्या दिवशी गावातील समाजबंधने नेमलेली आरोग्यसखी व इतर सक्रिय महिलांनी गावातील महिलांना कुर्माघरात ठेवावं कि घरी यावर चर्चा करण्यासाठी महिला सभा भरवली होती. काही गावात सुमारे १००च्या आसपास स्त्री-पुरुष या सभांना उपस्थित होते हे चित्र फारच आश्वासक आहे. सभेस उपस्थित सर्वांसमोर पाळीच्या काळात कुर्माघरात न राहता घरी राहण्याबद्दल विचारणा केली.

बातम्या आणखी आहेत...