आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चंद्रपुरात रस्ते अपघातात 420 जणांचा मृत्यू:272 जणांचा हेल्मेट न घातल्यामुळे तर 25 जणांचा सीटबेल्ट न घातल्याने मृत्यू

नागपूर8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रस्ते अपघातांची संख्या कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जिल्हा रस्ता सुरक्षा समिती स्थापन करण्यात आली आहे. मात्र चंद्रपूर जिल्ह्यात अपघातांची वाढती संख्या पाहाता आता प्रत्येक पोलिस ठाण्यात समित्या स्थापन करण्याची गरज व्यक्त होत आहे.

2022 मध्ये अपघातांच्या प्रमाणात वाढ झालेली आहे. या वर्षात चंद्रपूर जिल्ह्यात एकूण 841 अपघात झाले असून त्यामध्ये राष्ट्रीय, राज्य व शहरातील मार्गावरील अपघातांचा समावेश आहे. चंद्रपूर जिल्ह्यात जानेवारी 2022 ते डिसेंबर 2022 पर्यंत झालेल्या 841 अपघातामध्ये तब्बल 420 मृत्यू तर 693 नागरिक गंभीर जखमी झाले आहे.

420 पैकी 272 मृत्यू हेल्मेट न घातल्यामुळे झाले असून 25 मृत्यू चारचाकी वाहन चालकाने सीटबेल्ट न घातल्यामुळे झाले आहे. जिल्ह्यात एकूण 28 ब्लॅक स्पॉट आहे. त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू करण्यात आल्या असून 10 ब्लॅक स्पॉटवर प्रतिबंधात्मक कार्य पूर्ण झाले असले तरी अजूनही 18 ब्लॅक स्पॉट वर काम सुरू आहे.

2022 मध्ये सर्वाधिक अपघाताच्या घटना सायंकाळी 6 ते रात्री 9 वाजे दरम्यान घडलेल्या आहे. चंद्रपूर जिल्ह्यात अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलीस व वाहतूक प्रशासन काय करीत आहे, याबाबत वाहतूक पोलिस निरीक्षक प्रवीणकुमार पाटील यांच्याशी संपर्क साधला असता जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयात वाहतूक नियमांबाबत जनजागृती मोहीम सुरू असल्याचे सांगितले.

वाहतुक नियमाचे पालन करीत नसल्याने2023 या नव्या वर्षात कारवाईचा धडाका सुरू केला आहे. 1 ते 23 जानेवारीपर्यंत चंद्रपूर वाहतूक नियंत्रण शाखेने हेल्मेट परिधान न केलेल्या १ हजार ५६२ दुचाकी धारकांवर कारवाई केलेली आहे तसेच सीटबेल्ट न लावलेल्या 1 हजार 104 चारचाकी वाहन धारकांवर कारवाई करण्यात आली आहे. सोबतच 200 नागरिकांवर दारू पिऊन वाहन चालविण्याबाबत कारवाई जानेवारी महिन्यात करण्यात आली आहे.

रस्ते अपघात आता प्लेन मार्गावर मोठ्या प्रमाणात होत आहे. विरुद्ध दिशेने वाहन चालविणे, दारू पिऊन चालविणे, हेल्मेट न परिधान केल्यामुळे सदर अपघात होत आहे. सध्या हेल्मेटसक्ती ही राज्य व राष्ट्रीय महामार्गावर जाणाऱ्या दुचाकी चालकांवर होत आहे, काही दिवसांनी ही मोहीम शहरात सुद्धा राबविणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली.

जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण कमी करण्याकरिता जिल्हा पोलिस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांच्या आदेशाने नवीन वर्षात हेल्मेटसक्ती, सीटबेल्ट व ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह त्रिसूत्री नुसार चंद्रपूर वाहतूक नियंत्रक शाखा कारवाई करणार आहे असे प्रवीणकुमार पाटील यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...