आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना संकट:नागपुरात आश्रम परिसरात उभारले 5 हजार खाटांचे ‘कोविड केअर सेंटर’

नागपूरएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • शंभर बेडच्या मागे 20 डॉक्टरांचे पथक

कोरोना संकटात रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढून आणीबाणीसदृश परिस्थिती निर्माण झाल्यास आरोग्य सुविधा पुरवण्याची तयारी असावी, यासाठी उपराजधानी नागपूर जिल्ह्यात तब्बल ५ हजार खाटांच्या क्षमतेचे कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. अवघ्या काही दिवसांत या सेंटरची उभारणी करण्यात आली असून राज्यातील इतक्या मोठ्या क्षमतेचे व अल्प कालावधीत उभारले गेलेले पहिलेच कोविड केअर सेंटर असल्याचा दावा नागपूर महानगरपालिकेकडून करण्यात आला आहे.

नागपूर ग्रामीणमध्ये कळमेश्वर मार्गावरील येरला येथील राधास्वामी सत्संग न्यास या संस्थेच्या सहकार्याने त्यांच्या आश्रमाच्या परिसरात ५ हजार बेडचे नियोजन असलेले सर्व सोयींनी युक्त असे हे ‘कोविड केअर सेंटर’ उभारण्यात आले आहे. अशा प्रकारचे इतक्या मोठ्या क्षमतेचे व एवढ्या कमी कालावधीत तयार होणारे हे पहिले ‘कोविड केअर सेंटर’ ठरू शकते, अशी  माहिती नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली.  सध्या नागपुरात विविध ठिकाणी सुमारे ४२ विलगीकरण कक्ष उभारण्यात आले आहेत. क्षमतेच्या दृष्टीने आणि त्यामध्ये विलगीकरण करण्यात आलेल्या नागरिकांच्या संख्येच्या तुलनेत ते आता अपुरे पडण्याची शक्यता आहे. कारण नागपुरात जे व्यक्ती कोरोनाबाधित आढळत आहेत, त्यांच्या संपर्कातील सर्वच लोकांना सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने सक्तीच्या विलगीकरणात पाठवण्याची तयारी महापालिका प्रशासनाने केली आहे. विलगीकरण केलेल्या लोकांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. 

भविष्यात कोविड रुग्णसंख्येत वाढ झाल्यास त्यांची योग्य सोय अशा ठिकाणी व्हावी, त्यांच्यावर तेथेच उपचार करता यावेत, या दृष्टीने  ‘कोविड केअर सेंटर’ची संकल्पना मांडण्यात आली होती. त्यांच्या या संकल्पनेला राधास्वामी सत्संग न्यासने सहकार्य करत उपचार कालावधीसाठी जागा उपलब्ध करून दिली. केवळ जागाच नव्हे तर या सेंटरसाठी आवश्यक त्या सर्व सोयी उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली. मॅटिन, बॅरिकेडिंग, कम्पार्टमेंट, सायडिंग, डोम या सर्व व्यवस्था संस्थेने उपलब्ध करून दिल्या. इतकेच नव्हे तर शुद्ध पिण्याचे पाणी आणि रुग्णांकरिता सात्त्विक भोजन हीसुद्धा व्यवस्था संस्थेने केली आहे. डॉक्टर तसेच आरोग्य कर्मचारी, बेड, चादर, उशी, भोजनासाठी ट्रे व अन्य काही व्यवस्था नागपूर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आली आहे. केंद्र शासन आणि राज्य सरकारने ‘कोविड केअर सेंटर’बाबत ठरवून दिलेल्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करूनच हे ‘कोविड केअर सेंटर’ उभारण्यात आले आहे.

गरजेनुसार बेड्स वाढवणार: सध्या गरज नसल्याने या सेंटरमध्ये फक्त पाचशे बेड तयार ठेवण्यात आले आहेत. गरजेनुसार ते वाढवण्यात येणार आहेत. महिला आणि पुरुष रुग्णांसाठी स्वतंत्र बेड आणि प्रसाधनगृहांची व्यवस्था आहे. प्रत्येक बेडला क्रमांक देण्यात आले असून तोच रुग्ण क्रमांक राहील.

शंभर बेडच्या मागे २० डॉक्टरांचे पथक 

प्रत्येक १०० बेडच्या मागे २० डॉक्टर, वैद्यकीय चमू आणि इतर कर्मचाऱ्यांचे पथक कार्यरत असणार आहे. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांच्या काटेकोर अंमलबजावणीसह ‘कोविड केअर सेंटर’मध्ये उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. विलगीकरण केलेल्या रुग्णांसाठी आवश्यक ती सर्व वैद्यकीय व्यवस्था येथे करण्यात आली आहे. त्यांचे तापमान तपासणी, रक्त तपासणीही येथे केली जाणार आहे. याशिवाय रुग्णांचे येथे स्वॅब घेण्यात येतील. स्वॅबच्या अहवालानंतर रुग्ण जर पॉझिटिव्ह असेल आणि प्रकृती अतिगंभीर असेल तरच त्याची रवानगी रुग्णालयातील कोविड वॉर्डात करण्यात येईल. मात्र, पॉझिटिव्ह असतानाही जर प्रकृती गंभीर नसेल, सहज उपचार शक्य असतील तर त्याला तेथेच अन्य कक्षात स्थलांतरित केले जाईल. 

नागरिकांनी सूचनांचे पालन करावे : मुंढे

रुग्णांसोबतच या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तयारी असावी म्हणून सर्व सोयींनी युक्त असे हे कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. मात्र, या सेंटरची गरज पडू नये. त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करून सूचनांचे पालन करावे, असे मत महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केले.

बातम्या आणखी आहेत...