आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काळिमा:सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर नागपूरमध्ये शिक्षकाचा अत्याचार, 57 वर्षीय शिक्षकाला ठोकल्या बेड्या

नागपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला जिल्ह्यातील धामणदरी येथे चार अल्पवयीन मुलींवर दोन शिक्षकांनी अत्याचार केल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता नागपूर जिल्ह्यातही एका शिक्षकाने सहावीतील विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे.

सहावीतील विद्यार्थिनीवर बलात्कार करणाऱ्या एका खासगी शाळेतील शिक्षकाला सक्करदरा पोलिसांनी अटक केली आहे. हा शिक्षक डिसेंबर २०२२ पासून या विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण करत होता. सहावीत शिकणाऱ्या १२ वर्षीय मुलीने पोट दुखत असल्याचे तिच्या आईला एक-दोन वेळा सांगितले होते. ५ एप्रिल रोजी घरी आल्यावर तिने शाळेतील गणिताचे शिक्षक संजय विठ्ठल पांडे (५७) यांचे नाव सांगितले. पांडे पीडित मुलीला पेपर सुटल्यानंतर विज्ञान प्रयोग शाळेत नेऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवत होते, असे मुलीने आईला सांगितले. आईने मुलीला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता पांडे याने लग्न करणार असल्याचे सांगून वारंवार संबंध ठेवल्याचे सांगितले. ही गोष्ट कोणाला सांगितल्यास जिवे मारण्याचीही धमकी दिली. मुलीच्या आईने तक्रार दिल्यानंतर पोक्सोनुसार गुन्हा दाखल करून आरोपी शिक्षक संजय पांडे याला अटक केली आहे. सक्करदरा पोलिस ठाण्याचे ठाणेदार धनंजय पाटील यांनी आरोपी शिक्षकाला १५ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी मिळाल्याचे सांगितले. या प्रकरणी मुलीच्या आईने ११ तारखेला तक्रार देताच शिक्षक संजय पांडे याला लागलीच ठाण्यात आणण्यात आले. दिवसभर चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात आला.

अशी आहे कारवाईची प्रक्रिया
शाळेतील कर्मचाऱ्याने आगळीक वा एखादा गुन्हा केल्यास त्याच्यावर कारवाईचे अधिकार शाळा व्यवस्थापनाला असतात, अशी माहिती जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी रविंद्र काटोलकर यांनी दिली. या प्रकरणातील खासगी शाळेत पहिली ते दहावीपर्यंत वर्ग भरत असल्याने ती जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या अखत्यारित येते. या प्रकरणात संबंधित शाळा व्यवस्थापन आरोपी शिक्षकाला ताबडतोब निलंबित करेल, असे काटोलकर म्हणाले.

शाळेला निर्देश देणार
^शिक्षकाने विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याचे हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. या प्रकरणावर आम्ही लक्ष ठेवून आहोत. नियमानुसार कारवाईचे अधिकार संबंधित शाळा व्यवस्थापनाला असले तरी व्यवस्थापन कारवाई करते की नाही यावर आम्ही लक्ष ठेवू. आणि दिरंगाई होत असल्याचे लक्षात आल्यास तसे आदेश देऊ. या प्रकरणी हयगय खपवून घेतली जाणार नाही
- रवींद्र काटोलकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, नागपूर