आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हवामान बदल:राज्यात 77% शेती धोक्यात, आयसीएआरच्या अभ्यासातून गंभीर वास्तव समोर, मराठवाड्यासह 11 जिल्ह्यांना फटका

नागपूर / अतुल पेठकर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हवामानातील अनाकलनीय बदल, दुष्काळ आणि घटलेल्या जलसुरक्षेमुळे राज्यातील ३६ पैकी २४ जिल्ह्यांतील शेती धोक्यात आली आहे. यामध्ये मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील एकूण ११ जिल्ह्यांना सर्वाधिक फटका बसल्याचे इंडियन कौन्सिल ऑफ अॅग्रिकल्चर रिसर्च म्हणजे आयसीएआरच्या अभ्यासकांच्या चमूने केलेल्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे. म्हणजेच महाराष्ट्रातील जवळपास तीन चतुर्थांश पीकक्षेत्र हे वातावरणीय बदलामुळे धोक्यात आल्याचे दिसून येते.

महत्त्वाचे म्हणजे या ११ जिल्ह्यांत राज्याचे ४० टक्के पीकक्षेत्र आहे. त्याच वेळी राज्यातील ३७ टक्के पीकक्षेत्र असलेल्या १४ जिल्ह्यांना मध्यम स्वरूपाचा फटका बसला आहे. म्हणजेच महाराष्ट्रातील जवळपास तीन चतुर्थांश पीकक्षेत्र हे वातावरणीय बदलामुळे धोक्यात असल्याचे दिसून येते. राज्यात अनेक ठिकाणी येणारे पूर आणि हवामानातील तीव्र घटनांचा फटका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसत असून, वातावरणीय बदलांमुळे भविष्यात होणारा धोका या संशोधनातून समोर आला आहे. कमालीच्या वातावरणीय परिस्थितीमुळे उपजीविका आणि शेतीआधारित अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. इंडियन कौन्सिल ऑफ अॅग्रिकल्चर रिसर्च आणि नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूटमधील (एनडीआरआय) येथील चैतन्य आढाव यांनी हा अभ्यास केला आहे.

उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्हा हा चक्रीवादळे, पूर, पावसाचे बदलते पॅटर्न आणि तीव्र तापमानामुळे पिकांसाठी सर्वाधिक नुकसानकारक आहे. त्याशिवाय मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, नांदेड, परभणी आणि हिंगोली, विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती आणि वाशीम हे इतर दहा जिल्हे अधिक प्रमाणात नुकसानकारक व संवेदनशील असल्याचे या अभ्यासाचे लेखक चैतन्य आढाव यांनी सांगितले. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सोलापूर, मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद आणि विदर्भातील यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली हे इतर १४ जिल्हेदेखील मध्यम स्वरूपात धोक्यात असल्याचे हा अभ्यास दर्शवतो. शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर जाऊन त्याबाबत प्रात्यक्षिक देणे अतिशय आवश्यक आहे, असे या अभ्यास अहवालात म्हटले आहे.

राज्यात योग्य सिंचन व्यवस्थेचा अभाव
इंडिपेंडंट मेटोरोलॉजिस्ट अक्षय देवरस यांनी मोठा प्रभाव टाकणाऱ्या हवामानातील घटनांमुळे महाराष्ट्रातील शेती धोक्यात आल्याचे सांगितले. राज्यात योग्य सिंचन व्यवस्थेचा अभाव असून, मुख्यत: मराठवाडा आणि विदर्भातील पावसाच्या चढ-उतारामुळे पेरण्या आणि पिकाची वाढ यावर परिणाम होत आहे. परिणामी पीक उत्पादन हे अत्यंत धोकादायक झाल्याचे ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...