आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपुरात 12 वर्षीय मुलीवर 9 जणांचा बलात्कार:खुनाचा तपास करताना घटनेचा उलगडा, आरोपींचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता

नागपूर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

12 वर्षीय मुलीवर 9 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना नागपूर जिल्ह्यातील उमरेडमध्ये उजेडात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 9 नराधमांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या पाशवी कृत्यात आणखी काही आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिस त्या अंगाने तपास करत आहेत.

खुनाच्या गुन्ह्यातून उलगडा

उमरेड येथील कुख्यात गुंड रोशन सदाशिव कारगावकर याला एका खुनाच्या गुन्ह्यात 24 जुलै रोजी पोलिसांनी अटक केली होती. शुक्रवारी (ता. 29) त्याची पोलिस कोठडी संपत होती. या गुन्ह्याची चौकशी सुरू असताना राेशनने या पाशवी बलात्काराची कबुली दिली. घटनेचे गांभीर्य पाहाता ग्रामीण पोलिसांनी तपासाची वेगवान चक्रे फिरवत 9 आरोपींना बेड्या ठोकल्या.

पीडितेला जीवे मारण्याची धमकी

नागपूर ग्रामीण पोलिसांच्या उपविभागीय अधिकारी आणि तपास अधिकारी पूजा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित 12 वर्षीय मुलीचे आई-वडिल शेतमजुर आहेत. उमरेडमधील आरोपी गजानन मुरस्कर हा पीडित मुलीच्या घराजवळच राहतो. त्याच्या घरी कुख्यात गुंड रोशन सदाशिव कारगावकर (वय 29, उमरेड) याचे नेहमी येणे-जाणे होते. यादरम्यान, रोशनची नजर मुलीवर पडली. 19 जूनला मुलीचे आई-वडिल गावी गेले होते. दुपारी रोशन कारगावरकर आणि गजानन मुरस्कर हे दोघे मुलीच्या घरी आले. त्यांनी मुलीला उचलून रोशनच्या घरी नेले. तेथे तिच्यावर प्रेमदास जागोबा गाठीबांधे, गोविंदा गुलाब नटे आणि सौरव ऊर्फ करण उत्तम रिठे यांनी बलात्कार केला. यामुळे मुलगी बेशुद्ध पडली. सायंकाळी ती शुद्धीवर आल्यानंतर रोशनने तिला 300 रुपये दिले आणि याबाबत कुणालाही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.

अत्याचारामुळे पीडिता आजारी

सामूहिक बलात्कारानंतर 19 जून रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास पुन्हा रोशन तिच्या घरी गेला आणि तिला घराच्या स्लॅबवर घेऊन गेला. तेथे राकेश महाकाळकर, नितेश फुकट, प्रदुम्न कुरुटकर आणि निखिल ऊर्फ पिंकू निनायक नरुले असे पाच जण दारू पित बसले होते. तिला दमदाटी करून पाचही जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. पहाटेच्या सुमारास त्या मुलीला रोशनने तिच्या घरी सोडले. तब्बल नऊ जणांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्यामुळे ती मुलगी आजारी पडली.

आरोपी वाढण्याची शक्यता

15 जुलैला रोशनने गावातील मित्रांसोबत मुलीवर पुन्हा सामूहिक बलात्कार केला. दरम्यान, आरोपी रोशन याने पैशाच्या वादातून 24 जुलै रोजी एकाची हत्या केली. त्या गुन्ह्यात पोलिस कोठडीत असताना त्याने या गुन्ह्याची कबुली दिली. या प्रकरणी उमरेड पोलिसांनी सामूहिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करून 9 जणांना अटक केली. तसेच, या दुष्कृत्यात आणखी काही आरोपी सहभागी असल्याची शक्यता असून पोलिस तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...