आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामे महिन्यात आलेल्या वादळामुळे मुळासकट उन्मळून पडलेल्या सुमारे १५० वर्ष जुन्या वडाच्या झाडाला नवजीवन देण्यात मनपाच्या उद्यान विभागाला यश आले आहे. गोरेवाडा तलावाजवळील शासकीय क्वार्टर्स परिसरात झाडाचे पुनर्रोपण करण्यात आले असून उद्यान विभागाच्या या कामगिरीबद्दल मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी विभागाच्या चमूचे अभिनंदन केले.
२४ मे रोजी नागपूर शहरात जोराचे वादळ आले. या वादळामुळे शहरात अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटल्याच्या घटना घडल्या. मात्र यासोबतच मंगळवारी झोनमधील गोरेवाडा तलावाजवळील क्वार्टर्स परिसरात असलेले जुने विशाल वडाचे झाड मुळासकट कोलमडून पडले. सुमारे १५० वर्ष जुन्या या झाडाचा घेर १७ फुट एवढा आहे. या झाडाच्या पुनर्रोपणाचा निर्णय मनपाद्वारे घेण्यात आला. मनपा आयुक्तांच्या निर्देशानुसार उपायुक्त रवींद्र भेलावे यांच्या मार्गदर्शनात उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार व त्यांच्या चमूने झाडाच्या पुनर्रोपणाचे आव्हान स्वीकारले.
उद्यान विभागाच्या कर्मचाऱ्यांनी झाडाच्या सर्व फांद्या छाटल्या. मुळापासून वर २० फुटापर्यंत झाडाची उंची ठेवण्यात आली. हे करताना मनपाच्या कारखाना विभागाद्वारे जेसीबीने २५ फुट रुंद आणि १२ फुट खोल मोठा खड्डा खणण्यात आला. झाडाचे यशस्वी पुनर्रोपण करून ते पुढे जगावे यादृष्टीने पूर्ण काळजी घेण्यात आली. खणलेल्या खड्ड्याचे झाडाच्या वाढीच्या दृष्टीने निर्जंतुकीकरण करण्यात आले. माती, खत सर्व टाकण्यात आले. झाडाच्या फांद्या कापताना झाडाचा तोल हळुहळू खड्ड्याकडे झुकला जात असल्याने कुठल्याही क्रेनचा आधार न घेता झाडाचे सहजतेने पुनर्रोपण केले.
झाडाला पाण्यासोबत दिले खाद्यही
मोठ्या पाइपद्वारे उन्हाळ्यात झाडाला पाणी दिले जाते. तर इतर ३ पाईपांद्वारे झाडाच्या वाढीसाठी आवश्यक ‘ग्रोथ हार्मोन्स’चा पुरवठा केला जातो. मे महिन्यातील वादळानंतर पुन्हा ऊन वाढले आणि पुढे जुलै महिन्यात सतत मुसळधार पाऊस सुरू होता. मात्र अशाही परिस्थितीत झाड टिकून असल्याचे आनंददायी बाब आहे. झाडाच्या प्रत्येक फांदीवर नवीन पालवी फुटू लागली, असे उद्यान अधीक्षक अमोल चौरपगारंनी म्हटले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.