आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गडकरींच्या नागपूर शहरातील विदारक वास्तव:मालमत्ता करात 2 टक्के सूट, तरी चार्जिंग स्टेशनच्या जागेसाठी एकही प्रस्ताव नाही

नागपूर14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकीकडे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी इलेक्ट्रिक मोटार गाड्यांसाठी आग्रही असताना त्यांचेच शहर असलेल्या महापालिकेत मात्र या बाबतीत आनंदीआनंद आहे. शहरात इलेक्ट्रिक वाहनांची वाढती संख्या बघता चार्जिंग स्टेशन उभारणाऱ्या महापालिका हद्दीतील नागरिकांना तसेच गृह निर्माण संस्थांना मालमत्ता करात शासनाचे कर वगळून २ टक्के सूट देण्याचे महापालिका प्रशासनाने जाहीर केले आहे. मात्र, त्याला नागरिकांकडून अजूनही प्रतिसाद मिळत नसल्यामुळे मोठा पेच निर्माण झाला आहे.

चार्जिंग स्टेशन उभारणाऱ्या महापालिका हद्दीतील नागरिकांना, गृह निर्माण संस्थांना मालमत्ता करात शासनाचे कर वगळून २ टक्के सूट देण्याचे जाहीर केले होते. त्याबाबत विचारणा होत आहे. मात्र, अजूनही त्याबाबत एकही प्रस्ताव मिळालेला नाही, अशी माहिती नागपूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली.

वाहनातून निघणाऱ्या धुरामुळे वायू प्रदूषण होते. वायू प्रदूषणामुळे अनेक आजार उद्भवतात. इलेक्ट्रिकल वाहनांमुळे काही प्रमाणात वायू प्रदूषणावर आळा बसणार आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारणाऱ्या महापालिका हद्दीतील नागरिकांना, गृह निर्माण संस्थांना त्यांच्या मालमत्ता करात शासनाचे कर वगळून २ टक्के सूट देण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. महापालिकेकडून सहा चार्जिंग स्टेशन प्रस्तावित असून त्याला मंजुरी देण्यात आली आहे. ४० गाड्यांच्या चार्जिंग स्टेशनचे काम हिंगणा डेपो येथे सुरू आहे. तिथे चार्जिंग उपकरणांचे इन्स्टॉलेशन सुरू असून सुरू होण्यास किमान दोन महिने लागतील, अशी माहिती महापालिकेचे उपायुक्त रवींद्र भेलावे यांनी दिली.

४० गाड्या फेज टूमध्ये येणार असून त्याच्या चार्जिंग स्टेशनचे बांधकाम वाडीमध्ये सुरू आहे. येत्या काही दिवसात ते सुरू होईल, असे भेलावे यांनी सांगितले. या क्षणी २२ इलेक्ट्रिक बस सुरू आहे. त्याचे चार्जिंग लक्कडगंज येथे स्टेशन सुरू आहे. एका वेळी दोन गाड्या चार्ज होतात. एका गाडीला ४ ते ४.३० तास लागतात. एका चार्जिंगमध्ये १५० ते १८० किमी धावते. नागपूर शहरातील गृहनिर्माण संस्थांमध्ये सामायिक सुविधांतर्गत सदस्यांना इलेक्ट्रिक वाहन चार्जिंगची सुविधा उपलब्ध केल्यास संबंधित सदनिकेमधील,अपार्टमेंटमधील संबंधित गाळेधारकास गाळेनिहाय मालमत्ता करात शासनाचे कर वगळून २.५ टक्के सूट दिली जाणार असल्याचे महापालिकेच्या कर विभागाकडून जाहीर करण्यात आले. मात्र, त्याला अजूनही प्रतिसाद नाही. शहरात सध्या काही ठिकाणी इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग सेंटर निर्माण केले आहे, परंतु ते सर्वच बंद आहे. नागपूर विमानतळ आणि वर्धमाननगर येथे महापालिकेचे चार्जिंग स्टेशन वगळता शहरात चार्जिंग स्टेशन नसल्यामुळे ज्यांनी इलेक्ट्रिक वाहन घेतले आहे त्यांची आता अडचण होऊ लागली आहे.

चार वर्षांपासून स्टेशन बंद नागपुरात सुरेश भट सभागृहाच्या वाहनतळामध्ये चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले आहे. मात्र, चार वर्षांपासून ते बंद आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांची संख्या वाढत असताना चार्जिंग स्टेशन मात्र बोटावर मोजण्याइतके असल्यामुळे अनेक लोकांना वाहन घेऊन चार्जिंगसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.

बातम्या आणखी आहेत...