आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साखर परिषद:हरभरा उत्पादक शेतकरी व डाळ प्रक्रिया उद्योगांची नागपुरात परिषद भरवावी, शेतकरी नेते जावंधीयांची मागणी

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यात द्विदिवसीय साखर परिषद घेण्यात आली असून ऊस उत्पादक शेतकरी व साखर कारखानदारीवर चर्चा करण्यात आली. तद्वतच आपण पुढाकार घेऊन नागपुरात हरभरा उत्पादक शेतकरी व डाळ प्रक्रिया उद्योगांची परिषद भरवावी, अशी मागणी शेतकरी नेते जावंधीया यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. साखर कारखानदारांनी इथेनाॅलची निर्मिती केल्यास ते विकत घेण्याची हमी केंद्र सरकार घेण्यास तयार असल्याचे गडकरींनी पुण्यात बोलताना सांगितले.

म्हणजेच इथेनाॅलला एमएसपी देण्यास केंद्र सरकार तयार आहे. मग इतर पिकांना का नाही, असा सवाल जावंधीयांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डाळी व तेलबीयांबाबत आत्मनिर्भर करण्यासाठी शेतकऱ्यांना डाळी व तेलबीयांचे उत्पादन वाढवण्याचे आवाहन केले आहे. त्याला प्रतिसाद देत शेतकऱ्यांनी उत्पादन वाढवले. पण, हमीभाव मिळाला नाही याकडे जावंधीयांनी लक्ष वेधले आहे.

मागील वर्षी गव्हाला भाव नव्हता म्हणून शेतकऱ्यांनी हरभऱ्याचा पेरा जास्त केला. निसर्गाने साथ दिल्याने उत्पादनही चांगले झाले. पण, हमीभाव 5,250 रूपये क्विंटल असताना बाजारात 4000 ते 4200 पेक्षा जास्त भाव नाही. महाराष्ट्र सरकारला 6.8 लाख टन खरेदीची परवानगी दिली होती. तेवढी खरेदी पूर्ण झाल्यावर खरेदी बंद करण्यात आली. त्या नंतर पुन्हा 78 हजार क्विंटलची परवानगी दिली. तेवढी खरेदी झाल्याने आता खरेदी बंद आहे. शेतकऱ्यांना एक हजार क्विंटलचे नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर नागपुरात नागपुरात हरभरा उत्पादक शेतकरी व डाळ प्रक्रिया उद्योगांची परिषद भरवावी. त्यात शरद पवारांपासून सर्व संबंधितांना आमंत्रित करावे, असे जावंधीया यांनी पत्रपरिषदेत म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...