आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यातील कारंजा येथील इलेक्ट्रिशियन रहिम खान यांनी त्यांचा मुलगा शाफिन खान यासाठी भंगार साहित्यातून भन्नाट ई-बाईक तयार केली अाहे. ही ई-बाईक महागड्या ई-बाईकपेक्षा दिसण्यात, किंमतीत आणि कामगिरीतही सरस ठरत असून, या ई-बाईकची चर्चा वाशीम जिल्ह्यात सुरू आहे.रहिम खान यांचा धाकटा मुलगा शाफिन खान हा आपल्या घरापासून दूर असलेल्या कॉलेजला पायी जायचा. त्याचे मित्र मात्र महागड्या वेगवेगळ्या कंपनीच्या बाइकने कॉलेजला येत असत. हीच बाब त्याच्या मनात घर करून गेली की आपणही आपल्या मुलासाठी काहीतरी वेगळे करावे आणि याच संकल्पनेतून निर्माण झाली जुगाडू ई-बाईक.
शाफिनने आपल्या वडिलांकडे बाइक घेऊन देण्याचा हट्ट धरला. मात्र इलेक्ट्रिशियनचे काम करणाऱ्या आणि घरी छोटेसे वेफर्सचे दुकान चालवून संसाराचा गाडा हाकणाऱ्या रहिम खान यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांच्याकडे मुलाला एखाद्या कंपनीची बाइक घेऊन देण्याएवढे पैसे नव्हते. त्यांना ही बाब सलत होती. तेव्हा त्यांनी स्वतःच ई-बाईक निर्मितीचा निश्चय केला.
शाफिन खान या मुलाचे बाइकचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी रहिम खान यांनी भंगार साहित्याच्या दुकानातून बाइकसाठी लागणारे हँडल, शॉकअब्स, टायर यासह इतर साहित्य अगदी स्वस्तात खरेदी केले. नंतर एक २४ व्होल्ट बॅटरी अन् २४ व्होल्टची मोटार घेतली व घरी पडून असलेल्या मुलाच्या जुन्या सायकलच्या बॉडीवर ती बसवली. स्वतः इलेक्ट्रिशियन असल्याने त्यांनी सर्व सर्किट व्यवस्थित जोडून भंगार साहित्यापासून ई बाइक तयार केली. तिला स्पीडमीटर, हेडलाईट, साइड इंडिकेटर जोडून कलरिंगही केली. भंगारातून ही बाइक बनवण्यास रहिम यांना २ महिने लागले. जवळपास १८ ते १९ हजार रुपये खर्च आला आहे. आता ही बाइक ५० ते ६० किलो वजन घेऊन १५ ते २० किलोमीटर प्रतितास वेगाने रस्त्यावर धावत असून, शाफिन खान दररोज या भन्नाट ई-बाईकवरून कॉलेजला जात आहे.
मित्रांनाही माेह अावरेना : माझ्या वडिलांनी बनवलेली ही ई-बाईक इतकी मस्त आहे, की लाखो रुपयांच्या बाइक असलेल्या माझ्या मित्रांनाही या ई-बाईकची राइड घेण्याचा मोह आवरत नाही. माझे बाइकवरून कॉलेजला जाण्याचे स्वप्न पूर्ण झाल्याचे शाफिन खानने सांगतिले अाहे.
आर्थिक मदतीची गरज
रहिम खान यांनी बनवलेल्या या ई-बाईकला जास्त क्षमतेची बॅटरी आणि मोटार जोडली, तर हिची क्षमता आणि वेगही वाढवता येईल व उच्च दर्जाची ई-बाईक बनवून ती सामान्यांना परवडेल अशा किमतीत तयार होईल. ज्यामुळे शाफिन खानसारख्या अनेकांचे बाइकचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत मिळेल. त्यासाठी रहिम खान यांना आर्थिक पाठबळ मिळण्याची गरज आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.