आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

महापौरांचे हनी ट्रॅप प्रकरण:उपराजधानीत राजकीय नेत्यांचा एकमेकांना "पाॅलिटिकल ट्रॅप’मध्ये अडकवण्याचा गेम

नागपूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
विविध राजकीय पक्षांचे नेते आणि विद्यमान मंत्र्यांसाेबत साहिल सय्यदची छायाचित्रे तो सर्वपक्षीय असल्याचे दर्शवतात.
  • साहिल सय्यदसोबत बावनकुळेंच्या व्यावसायिक भागीदारीचा आरोप

नागपूरचे महापौर संदीप जोशी व नगरसेवक दयाशंकर तिवारी यांना “हनी ट्रॅप’मध्ये अडकवण्याचे संभाषण असणारी एक आॅडिओ क्लिप व्हायरल झाल्याच्या दिवसापासून उपराजधानी नागपुरातील वातावरण ढवळून निघाले असून राजकीय पक्षांकडून एकमेकांना “पाॅलिटिकल ट्रॅप’मध्ये अडकवण्याचा गेम सुरू झाला आहे. हा खेळ आता कोणते वळण घेतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

महापौर संदीप जोशी व नगरसेवक दयाशंकर तिवारी यांना “हनी ट्रॅप’मध्ये अडकवण्याचे संभाषण असलेली ही आॅडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १४ जुलै रोजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र लिहून या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती. कारण यातील एकाने गृहमंत्री अनिल देशमुख यांचेही नाव घेतले होते. त्यावर १७ जुलै रोजी गृहमंत्र्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात संभाषण असलेला साहिल सय्यद हा भाजपचा कार्यकर्ता असल्याचे नमूद केले. माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे व माजी आमदार सुधाकर देशमुख यांच्या जवळचा असून त्यांचा व्यावसायिक भागीदार असल्याचे देशमुख यांनी नमूद केले आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलेला व्यावसायिक भागीदारीचा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी फेटाळला आहे. फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात अनिल देशमुख यांनी खोटे आरोप केल्याचे म्हटले आहे. देशमुख यांनी पुराव्यासह आरोप करावेत, अन्यथा माफी मागावी, असे बावनकुळे यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा वादग्रस्त नेता साहिल सय्यद याने नावे बदलवून अनेकांची फसवणूक केली आहे. गुन्हे शाखेने साहिलवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. साहिल सय्यद व महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण गंटावार या आॅडिओ क्लिपमुळेच चर्चेत आले.

एकमेकांना ट्रॅप करण्याचा प्रयत्न

या प्रकरणात साहिल सय्यद हा भाजपचा कार्यकर्ता असल्याचा आरोप होताच राष्ट्रवादी समर्थकांकडून त्याची चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडणवीस तसेच सुधाकर देशमुखांसोबतची छायाचित्रे सोशल मीडियावर प्रसिद्ध होत आहेत, तर प्रत्युत्तर म्हणून भाजप समर्थकांकडून ऊर्जामंत्री नितीन राऊत, क्रीडामंत्री सुनील केदार, गृहमंत्री अनिल देशमुख, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबतची छायाचित्रे प्रसिद्ध करण्यात येत आहेत.