आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या दोन महिन्यांपासून गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात उच्छाद मांडणाऱ्या रानटी हत्तींचा कळप परत निघाला असून त्यांचा मुक्काम कुरखेडा तालुक्यातील घाटी गावालगतच्या जंगलात असल्याची माहिती वन विभागाने दिली आहे.
छत्तीसगडवरून धानोरा तालुक्यातील मुरुमगाव वनपरिक्षेत्रात दाखल होत रानटी हत्तीच्या कळपाने साधारण १०० ते १५० किमीचे अंतर पूर्ण केले आहे. यादरम्यान कळपाने गोंदिया व गडचिरोली येथे दोन नागरिकांचा बळी घेतला. शेकडो हेक्टर शेतातील पिकांची नासधूस केली. अनेक ठिकाणी घरांचीही मोडतोड केली. सध्या हा कळप कुरखेडा तालुक्यात घाटी गावानजीक जंगल परिसरात आहे. रात्रीच्या सुमारास हत्तींनी पळसगाव, नवरगाव भागात शेतात ठेवलेल्या धानाची नासधूस केली. महिला बचत गटाच्या गांडूळ खत प्रकल्पाचीही मोडतोड केली.
सध्या जिल्ह्यात धान कापणीचा हंगाम असल्याने मळणी सुरू आहे. त्यामुळे धानपिकावर संकट ओढवले आहे. तर दुसरीकडे वन विभागाकडून नुकसानीचे तत्काळ पंचनामे होत असले तरी मदतीचे दावे शासनाकडे प्रलंबित असल्याने अनेकांना भरपाई मिळालेली नाही. भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यात दाखल झालेला हत्तींचा कळप पाहायला दुचाकीने जाणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले असून हत्तीच्या मार्गात आलेल्या दुचाकीला अक्षरश: फुटबॉलसारखे उडवून पायाखाली तुडविले. यात दुचाकीचे नुकसान झाले आहे. ही घटना लाखांदूर तालुक्यातील इंदोरा ते मेंढा मार्गावर घडली आहे. या घटनेचा व्हीडीओ शुक्रवारी व्हायरल झाला होता.
चप्राड येथील सुरेश दीघोरे आपल्या मित्रासोबत हत्ती पहायला दुचाकीने गेले होते. दरम्यान, अचानक हत्तींचा कळप जवळ येत असल्याचे पाहताच दुचाकी रस्त्यावर ठेवून तरुणांनी धूम ठोकली. मात्र, त्याचवेळी कळपातील एका हत्तीने आपल्या मार्गात दुचाकी बघत दुचाकीला अक्षरश: फुटबॉलसारखे उडवून दिले, याचा व्हिडिओ आता प्रचंड वायरल होत आहे. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.
यापूर्वी २ डिसेंबर रोजी काही अतिउत्साही आणि आगाऊ तरूणांनी गावाजवळून जाणाऱ्या रानटी हत्तींच्या कळपा जवळ धावत जात फोटो आणि व्हिडीओ काढण्याचे केलेले धाडस त्यांच्या अंगलट येता येता राहिले होते. कारण यातील एका हत्तीने या तरूणांचा काही दूर अंतरापर्यत पाठलाग केला होता. त्यावेळीही व्हिडीओ खूप व्हायरल झाला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.