आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परिसंवाद:साहित्यनगरीत शेतकरी नेत्यांच्या भाषणात बळीराजाची “क्षणभर विश्रांती’

वर्धा / आशिष पावडे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या साहित्यनगरीतील आचार्य विनोबा भावे सभामंडपात परिसंवादामध्ये शेतकरी संघटनेचे नेते विजय जावंधिया यांचे भाषण सुरू असताना, शेतकऱ्यांनी दुर्लक्ष करत चक्क क्षणभर विश्रांती घेतल्याचे चित्र दिसून आले. या वेळी शेतकरी संघटनेचे नेते विजय जावंधिया म्हणाले की, शेतकऱ्यांना पूर्ण स्वातंत्र्य मिळेल व बाजारात त्यांची लूट होणार नाही, यावर चर्चा होणे गरजेचे आहे. गेल्या काही वर्षांत शेतकऱ्यांचे उत्पन्न किती वाढले? किती ग्रामीण तरुण-तरुणींना नोकऱ्या मिळाल्या, याची उत्तरे मिळत नाहीत. २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होणार होते. देशाच्या अर्थतज्ज्ञांनी हे सांगावे, की २०१४ ते २०२० या कालावधीत शेतकऱ्यांचे उत्पन्न किती वाढले? डॉलरमध्ये सोन्याचे भाव वाढले, म्हणून भारतातही वाढले.

सर्व शेतमालाचे भाव जागतिक बाजारात डॉलरमध्येच कमी झालेले आहेत. त्यामुळेच भारतीय रुपयाचे अवमूल्यन होऊनही जागतिक बाजारात शेतमालाच्या भावात मंदी कायम आहे. जागतिक बाजारातील शेतमालाच्या भावाच्या मंदीमुळेच भारतीय शेतकऱ्यांना निर्यात करूनही भाव मिळू शकत नाही. आज जागतिक बाजारात गहू, तांदूळ, साखर, कापूस, खाद्य तेल इत्यादींचे भाव सरकारने जाहीर केलेल्या हमीभावापेक्षाही कमी आहेत. ही आजचीच परिस्थिती नाही, तर १९९७ नंतर हे सातत्य टिकून आहे. महात्मा फुलेंनी “शेतकऱ्याचा आसूड’मधून ज्या पद्धतीने शेतकऱ्यांचे दुःख मांडले, त्या पद्धतीचे लेखन आज होणे गरजेचे आहे, असे जावंधिया म्हणाले.

शेतकऱ्यांनी फिरवली पाठ एकीकडे शेतकऱ्यांच्या समस्यांवर हा परिसंवाद सुरू असताना शेतकरी वर्ग साहित्यनगरीत फिरकला नाही, उलट मंडपातील खुर्च्यांवर दोन शेतकऱ्यांनी या महत्त्वपूर्ण भाषणाकडे दुर्लक्ष करत विश्रांती घेतल्याचे चित्र पाहावयास मिळाले. या वेळी साहित्यनगरीतील बहुतांश खुर्च्याही रिकाम्या असल्याचे दिसून आले. तसेच जे कोणी परिसवांदात बसले होते तेदेखील अधूनमधून मोबाइल चाळत होते. त्यामुळे या परिसंवादाची चर्चाही मोठ्या प्रमाणात येथे झाली.

बातम्या आणखी आहेत...