आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गा’च्या पहिल्या टप्प्यातील नागपूर ते शिर्डी (कोकमठाण) या ५२० किलोमीटर लांबीच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच झाले. या महामार्गावर वाहनांना सहजपणे इंधन मिळावे यासाठी १३८.४७ मेगावॅट सौरऊर्जेची निर्मिती करण्यात येईल. याशिवाय दक्षिण कोरिया सरकारशी झालेल्या करारानुसार महामार्गावर अत्याधुनिक इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम दोन वर्षांत द्विपक्षीय निधीद्वारे स्थापित करण्याची योजना आहे. यामुळे या महामार्गावरील वाहतुकीला शिस्त लावणे सोपे होणार आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गाचा शिर्डी ते मुंबई हा दुसरा टप्पा जुलै २०२३ पर्यंत सामान्य वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. नागपूर ते शिर्डी हे अंतर पार करण्यासाठी पूर्वी १३ तास लागत, आता यासाठी ५ तासच लागतील. मुंबई ते औरंगाबाद या प्रवासाचाही वेळ आता कमी झाला आहे. या प्रकल्पाची एकूण किंमत ५५ हजार ३२५ कोटी रुपये आहे. या महामार्गांतर्गत एकूण १९०१ कामांपैकी १७८७ कामे पूर्ण झाली असून ११४ कामे प्रगतिपथावर आहेत.
महामार्गाची घोषणा ते पूर्तता
नागपूर व मुंबई प्रवास सोयीचा व्हावा यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ३१ ऑगस्ट २०१५ रोजी नागपूर-मुंबई शीघ्र संचार द्रुतगती महामार्ग तयार करणार, अशी घोषणा केली होती. ३० नोव्हेंबर २०१५ रोजी पायाभूत सुविधा समिती बैठकीत निर्णय झाला. राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री तथा तत्कालीन नगरविकास व सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कार्यवाही सुरू झाली. या यंत्रणेने या कालावधीत गतिमान पद्धतीने काम केले.
महामार्गावर असेल अशी सुविधा, पर्यावरणाचा समतोलही राखणार
15 रुग्णवाहिका । 15 शीघ्र प्रतिसाद वाहने । 122 सुरक्षा रक्षक तैनात
01 हजारांवर असतील महामार्गालगत शेततळी
11 लाखांहून अधिक वृक्ष लागवड मार्गालगत
22 लाखांहून अधिक झुडपे व वेलींचे रोपण
आपत्कालीन व्यवस्था
महामार्गावर अपघात किंवा बिघाड झाल्यास हेल्पलाइन 1800-2332233, 8181818155 या क्रमांकावर मदतीसाठी संपर्क साधता येईल. महामार्गावर ठिकठिकाणी हेल्पलाइन क्रमांक प्रदर्शित करण्यात येतील. आपत्कालीन वैद्यकीय सेवांसाठी रुग्णवाहिकेकरिता 108 या क्रमांकावर संपर्क साधता येईल.
पाच लाख लोकांना रोजगार
"कृषी समृद्धी केंद्र' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवीन शहरांची उभारणी या मार्गावर केली जात आहे. या शहरांच्या विकासासाठी १८ स्थाने ठरवलेली आहेत. या ठिकाणी कौशल्य विकास केंद्रे, अत्याधुनिक आरोग्य सुविधा, शैक्षणिक संस्था व आयटी पार्क उभारले जातील. शहरांमध्ये उभारलेले कृषी आधारित उद्योग शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न वाढवण्यासाठी रोजगार, स्वयंरोजगार आणि इतर संधी उपलब्ध करून देतील. या महामार्गामुळे सुमारे ५ लाख लोकांना रोजगार मिळेल अशी अपेक्षा आहे.
पर्यटनाला चालना
हा महामार्ग शिर्डी, वेरूळ, लोणार सरोवर, अजिंठा, औरंगाबाद, त्र्यंबकेश्वरचे ज्योतिर्लिंग व घृष्णेश्वर, नाशिक, इगतपुरी इत्यादी स्थळांना जोडत असल्याने पर्यटनाला चालना मिळेल. दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टच्या माध्यमातूनही मालाची जलद वाहतूक सुलभ होईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.