आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृत्रिम प्रजनन प्रकल्प:माळढोक कृत्रिम प्रजनन प्रकल्पासाठी तीन ते चार वर्षे प्रतीक्षा

विनोद कामतकर | चंद्रपूर10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नैसर्गिक अधिवासातील माळढोक पक्ष्यांना आणून त्यांचे बंदिस्त प्रजनन अशक्य असते. त्याऐवजी त्या पक्ष्यांची अंडी कृत्रिम पद्धतीने उबवून त्यामधून बाहेर पडणाऱ्या पिल्लांचे संरक्षण व संवर्धन हाच पर्याय आहे. पण त्यासाठी संरक्षित क्षेत्र, नैसर्गिक अधिवाससह, प्रशिक्षित टीमची आवश्यकता असते. सोलापूरमध्ये कृत्रिम प्रजननासाठी सुरुवातीची तीन-चार वर्षे नैसर्गिक अधिवास निर्मिती, माळढोकांच्या अंड्यांची पुरेशी उपलब्धता झाल्यानंतर त्यासंदर्भात विचार होऊ शकतो, त्यासाठी आणखी चार-पाच वर्षांचा कालावधी लागेल, असे वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे (डब्ल्यूआयआय) शास्त्रज्ञ डॉ. सुतीर्था दत्ता यांनी सांगितले.

चंद्रपूर येथे आयोजिलेल्या ३५ व्या महाराष्ट्र पक्षी मित्र संमेलनात डॉ. दत्ता यांचे ‘माळढोक पक्षी आणि धोके’ या विषयावर त्यांचे व्याख्यान झाले. राजस्थानातील माळढोक कृत्रिम प्रजनन केंद्राचे समन्वयक डॉ. दत्ता यांच्याशी ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधीने संवाद साधला. ते म्हणाले, ‘देशभरात फक्त १५० माळढोक पक्षी शिल्लक आहेत. त्यापैकी ९० टक्के पेक्षा अधिक फक्त राजस्थानमध्ये आहे. शेवटची घटका मोजणाऱ्या या पक्ष्यांना वाचवण्यासाठी कृत्रिम प्रजनन हाच एकमेव पर्याय असल्याचे अभ्यासाद्वारे समोर आले. केंद्रीय वन, पर्यावरण व हवामान बदल मंत्रालय, राजस्थान वन विभाग व डब्ल्यूआयआय यांनी राजस्थानमध्ये कृत्रिम प्रजनन केंद्र सुरू केले. सध्या त्या सेंटरमध्ये १६ पेक्षा अधिक पिल्ले आहेत.

नान्नज (ता. उत्तर सोलापूर) येथील माळढोक अभयारण्यात कृत्रिम प्रजनन करण्यासाठी वन्यजीव विभागाने शासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे. गेल्या महिन्यात वन्यजीव विभागाचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक क्लेमेंट बेन, उपवन संरक्षक तुषार चव्हाण यांनी राजस्थानातील त्या प्रकल्पाची पाहणी केली आहे. अंडी आणून त्यापासून कृत्रिम प्रजनन शक्य आहे. पण, सुरवातीला नैसर्गिक अधिवास तयार करा, अशा सूचना वन्यजीव विभागाच्या पथकास दिल्याचे, डॉ. दत्ता यांनी सांगितले.

माळढोक वर्षभरात तीन ते चार अंडी घालतात माळढोक पक्षी हा पक्षी उघड्या माळरानावर घरटे करतो. त्यामध्ये अंडी घातली आहे, हे आमच्या पथकातील लोकांच्या लक्षात आल्यानंतर ते अंडे आम्ही एका संरक्षित बॉक्समध्ये ठेवून कृत्रिम प्रजनन केंद्रात आणतो. घरट्यात अंडी नसल्याचे दिसल्यानंतर पुढील दोन-तीन दिवसांमध्ये मादी पुन्हा एक अंडी घालते. एक मादी पक्षी वर्षभरात किमान तीन-चार अंडी घालते हे निरीक्षण अभ्यासाद्वारे स्पष्ट झाले आहे.

पिल्ले जिवंत राहण्याचे प्रमाण २० टक्केच माळढोकची मादी पिल्लांना पाच ते सहा महिन्यांपर्यंत स्वत: चोचीने अन्न भरवते. नऊ-दहा महिन्यांपर्यंत पिल्लू आईच्या सोबत राहते. त्यानंतर मादी त्यास स्वत:पासून दूर केल्यानंतर ती पुन्हा अंडी घालते. पण, नैसर्गिक अधिवासामध्ये अंड्यातून बाहेर पडल्यानंतर ते पिल्लू सुरुवातीच्या ९० दिवसांपर्यंत जिवंत राहण्याचे प्रमाण फक्त २० टक्केपर्यंत आहे. त्यामुळे या पक्ष्यांची संख्या वाढत नसल्याचे डॉ. दत्ता यांनी सांगितले.

अति उच्च दाब वीज वाहिन्यांचा पक्ष्यांना फटका राजस्थानमध्ये अति उच्च दाबाच्या वीज वाहिन्यांचे मोठे जाळे सर्वदूर वाढत आहे. डेझर्ट नॅशनल पार्क परिसरात एक वर्ष केलेल्या सर्वेक्षणात अति उच्च दाबाच्या वीज वाहिन्यांचा धडकून ४० विविध प्रजातींचे एक लाख पक्ष्यांचा मृत्यू झाल्याच्या नोंदी आहेत. त्याबाबत सर्वोच्च न्यायालयात त्यासंदर्भात जनहित याचिका दाखल केली. राखीव वनक्षेत्र, अभयारण्यातील वीज वाहिन्या भूमिगत करा अथवा हद्दीच्या बाहेरून काढा. तसेच, वीज वाहिन्यांना बर्ड डायर्व्हेटर बसवण्याचे न्यायालयाने आदेश दिले.

बातम्या आणखी आहेत...