आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागोंदिया जिल्ह्यातील हिरडामाली रेल्वेस्थानक मार्गावरील सोडला गोंदी ते घराडा रेल्वे चौकीपासून सुमारे अडीच किमी पुढे १० महिने वाढीच्या वाघाच्या बछड्याचा मालगाडीखाली कटून मृत्यू झाला. याची माहिती वनविभागाला देण्यात आली आहे. टी-१४ वाघीणीच्या तीन बछड्यांपैकी हा एक आहे. वाघीण आणि तिचे दोन बछडे सुरक्षित आहे.
अपघातात या बछड्याचा उजवा पाय तुटून वेगळा झाला. तर मणक्याचे हाड व शेपटी तुटली आहे. सकाळी ७.४५ वाजता गेलेल्या मालगाडीखाली कटून हा अपघात झाला. या संदर्भात गोंदियाचे मानद वन्यजीव रक्षक मुकुंद धुर्वे यांच्याशी संपर्क साधला असता रेल्वे मार्गावर मालगाडी वा प्रवासी रेल्वेखाली कटून वन्यप्राण्यांचे मृत्यू होण्याचे प्रकार नेहमी घडतात. मात्र, रेल्वे खात्याने असे प्रकार होऊ नये म्हणून काळजी घेतली पाहिजे, असे सांगितले. निदान जंगल भागातून जाणाऱ्या मार्गांवरील वेग कमी ठेवला तरी बऱ्याच दुर्घटना टळू शकतात, असे धुर्वे म्हणाले.
यापूर्वीही घडल्या अशा घटना
बल्लारपूर-गोंदिया पॅसेंजरखाली येऊन वाघांच्या तीन बछड्यांचा मृत्यू झाल्याची घटना २०१८ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील जुनोना जंगल परिसरात घडली होती. यातील दोन बछड्यांचे मृतदेह ट्रॅकवर तर तिसऱ्या बछड्याचा मृतदेह ट्रॅकपासून काही अंतरावर सापडले होते. जुनोना जंगलातून बल्लारपूर-गोंदिया हा रेल्वे मार्ग आहे. सकाळी निघणाऱ्या ५८८०३ क्रमांकाच्या बल्लारपूर-गोंदिया रेल्वेने हा अपघात झाला होता. जंगलात खेळता खेळता हे बछडे रेल्वेमार्गावर आले होते. त्याच दरम्यान तेथून गेलेल्या रेल्वेखाली कटून बछड्यांचा मृत्यू झाला होता.
चंद्रपूर-गोंदिया रेल्वेमार्गावरील चिखली कन्हारगाव रेल्वे क्राॅसिंगजवळ असे अपघात होतात. राजोली वनपरििक्षेत्रातंर्गंत येत असलेल्या चिखलीच्या जंगलातून रेल्वेचा रस्ता गेलेला आहे. या जंगल परिसरात मोठ्या संख्येने वन्यप्राणी असून यापूर्वीही रेल्वेच्या धडकेत प्राण्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहे. वन्यप्राण्यांच्या मार्गात अंडरपास बांधण्यात यावे असे निर्देश असतानाही रेल्वे प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.