आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:रेल्वेच्या धडकेत वाघाचा मृत्यू, निर्देश असतानाही रेल्वे प्रशासनाचे अंडरपासकडे दुर्लक्ष

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव वनपरिक्षेत्रातील वडेगाव ते वडसा रेल्वे मार्गाच्यामधे कोरंभीजवळ रेल्वेच्या धडकेत वाघाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली.

वाघ लाखांदूर भागातला असावा असा वन विभागाचा अंदाज आहे. कारण मागील दोन ते तीन महिन्यापासून या भागात त्याचे वास्तव्य होते. त्याचे फोटोही मिळालेले आहेत. अपघातात वाघाचे मागील डावीकडले पाय तुटलेले असून कमरेवर मोठी जखम आहे. तसेच तोंडाकडेही जखम असून भरपूर रक्त वाहिलेले आहे. वय साधारणतः 6 वर्षाचे असावे. वनविभागाने राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाच्या गाईडलाईननुसार अंत्यसंस्कार केले. या घटनेने वन्यप्राण्यांच्या अंडरपासची मागणी करण्यात येत आहे.

2018 मध्येही अपघात

यापूर्वी 2018 मध्ये रेल्वेच्या धडकेत बिबट्याचा तसेच वाघांच्या तीन बछड्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. चंद्रपूर-गोंदिया रेल्वेमार्गावरील चिखली कन्हारगाव रेल्वे क्राँसिगजवळ 2 वर्षीय बिबट्याचा रेल्वेच्या धडकेने मृत्यू झाल्याची घटना घडली होती. राजोली वनपरिक्षेत्रातंर्गंत येत असलेल्या चिखलीच्या जंगलातून रेल्वेचा रस्ता गेलेला आहे. या जंगल परिसरात मोठ्या संख्येने वन्यप्राणी असून यापूर्वीही रेल्वेच्या धडकेत प्राण्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहे. वन्यप्राण्यांच्या मार्गात अंडरपास बांधण्यात यावे असे निर्देश असतानाही रेल्वे प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे.

यापूर्वी झाला होता तीन बछड्यांचा मृत्यू

बल्लारपूर-गोंदिया पॅसेंजरखाली येऊन वाघांच्या तीन बछड्यांचा मृत्यू झाल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यातील जुनोना जंगल परिसरात घडली होती. यातील दोन बछड्यांचे मृतदेह ट्रॅकवर तर तिसऱ्या बछड्याचा मृतदेह ट्रॅकपासून काही अंतरावर सापडले होते. जुनोना जंगलातून बल्लारपूर-गोंदिया हा रेल्वे मार्ग आहे. सकाळी निघणाऱ्या 58803 क्रमांकाच्या बल्लारपूर-गोंदिया रेल्वेने हा अपघात झाला होता. जंगलात खेळता खेळता हे बछडे रेल्वेमार्गावर आले होते. त्याच दरम्यान तेथून गेलेल्या रेल्वेखाली कटून बछड्यांचा मृत्यू झाला होता.

बातम्या आणखी आहेत...