आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूर:चौदा महिन्यांच्या आस्तिक्यने नोंदवला विक्रम, ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद

नागपूर / अतुल पेठकर2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

साधारणतः वयाच्या पंधरा महिन्यांपर्यंत मुले जेमतेम ५ शब्द बोलताना दिसून येतात. मात्र, येथील चौदा महिन्यांचा आस्तिक्य मृगाशिष चक्क शरीराच्या १५ क्रिया, अवयव, भाजीपाला, प्राण्यांची नावे सांगतो. त्याच्या या अतर्क्य गुणविशेषाची नोंद ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ने घेतली आहे.

अगदी लहान वयात आई-वडील चिमुकल्यांच्या हाती मोबाइल देतात. मोबाइलच्या स्क्रीन टाइम मुळे चिमुकल्यांच्या भाषेवर परिणाम होतो, तसेच त्यांच्यातील कुठलीही गोष्ट आत्मसात करण्याची क्षमता कमी होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आई मृगा आणि वडील आशिष यांनी आस्तिक्यचा जन्म होताच घरातील टीव्ही आणि मोबाईल काढून घेतला. त्याचवेळी त्याच्याकडून विविध ॲक्टिव्हिटी करून घेण्यास सुरुवात केली. त्यात कोडी, संभाषण, उतारेवाचन, भाषा शिक्षण यांचा समावेश होता. त्यातूनच अवघ्या चौदा महिन्यांच्या वयात आस्तिक्यमध्ये अनेक अनोखे गुण विकसित झाले. मृगा आणि आशिष यांनी ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’साठी त्याची नोंदणी केली. . रेकॉर्ड डेटाबेसमध्ये विसंगतीला वाव नसलेल्या विस्तृत तपासणीनंतर जुलै महिन्यात त्याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. त्यानंतर त्याचे नाव ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंदवले. ऑगस्ट महिन्यात आस्तिक्यला प्रमाणपत्र आणि अवॉर्ड पाठवण्यात आले.

शिकणे ही मुलांची सहज प्रवृत्ती
तान्हे मूल शिकण्याची इच्छा घेऊनच जन्माला येते. सुरूवातीला पाहून आणि अनुकरणातून मुले शिकतात. पालक किती जागरूक आहेत आणि मुलाला किती एक्स्पोजर मिळते, त्यावर बरेच काही अवलंबून असते. मुलांची स्मरणशक्ती आणि नवे काही ग्रहण करण्याची क्षमता खूप तीव्र असते. पोटाला लागते तशी मेंदूलाही भूक लागते. त्यातून मूल शिकत जाते. पाहून वा अनुकरणातून, प्रयोगातून चुकत चुकत शिकते. काही मुलांमध्ये जनुकीय बुद्धिमत्ता असते. अशी मुले जात्याच हुशार असतात. - डाॅ. श्रीकांत चोरघडे, ख्यातनाम बालरोगतज्ज्ञ

असे आहे रेकॉर्ड
आस्तिक्य मृगाशिष (जन्म : ५ मे २०२०) याने ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये शरीराचे १० अवयव ओळखले. याशिवाय, ५ नातेवाईक, ६ प्राणी, ४ वाहने, ५ फळे, १० घरगुती वस्तू ओळखून त्याची माहिती दिली. १५ क्रियाही त्याने विषद केल्या. विशेष म्हणजे, त्याने चार प्राण्यांच्या आवाजाचेही अनुकरण केले. यावेळी त्याचे वय १४ महिन्याचे होते.

बातम्या आणखी आहेत...