आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चंद्रपूर जिल्ह्यातील प्रकार:मजुराच्या खात्यात जमा झाले 99 कोटी ; नंतर त्याच खात्यात रक्कम परत पाठवली

नागपूर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील एका मजुराच्या बँक खात्यात तब्बल ९९ कोटी ९८ लाख १०६ रुपयांची रक्कम जमा झाल्याचा प्रकार घडला. सध्या चंद्रपूर जिल्ह्यात ही घटना चर्चेचा विषय आहे. एवढ्या मोठ्या रकमेचा मोबाइलवरील संदेश पाहून मजुरासह गावकऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. अर्थात, ज्या खात्यातून आले होते त्याच खात्यात बँकेच्या माध्यमातून पैसे परत पाठवण्यात आल्याची माहिती आहे.

नागभीड तालुक्यातील मांगली येथील रहिवासी राजू देवरा मेलाम (४०) हा मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. त्याचे बॅँक ऑफ इंडियाच्या नागभीड येथील शाखेत खाते असून त्याच्या या बँक खात्यात ९९ कोटी ९८ लाख १०६ रुपये जमा झाले. तसा संदेश बँकेकडून त्याच्या मोबाइलवर आला. मेसेज पाहून त्याने गावात काही नागरिकांनाही याबाबतची माहिती दिली. दरम्यान, शुक्रवारी बँक ऑफ इंडियाच्या नागभीड शाखेतून राजू मेश्राम यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क करण्यात आला. या वेळी बँक अधिकाऱ्यांनी तुमच्या बँक खात्यात ९९ कोटी ९८ लाख १०६ रुपये जमा करण्यात आल्याची माहिती दिली. तसेच इतक्या मोठ्या रकमेचे विवरण सादर करण्यास सांगण्यात आले.

बँक अधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर राजू मेश्राम घाबरला. लगेच आपल्या एका सहकाऱ्यासह बँकेत जाऊन संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेतली. तेव्हा बँक अधिकाऱ्यांनी खात्यात जमा झालेल्या रकमेबाबत विचारणा केली असता मेश्रामने प्रामाणिकपणाने ही रक्कम आपली नसून चुकून आली असावी, असे बँक अधिकाऱ्यांना सांगितले. त्यामुळे बँक अधिकाऱ्यांनी नंतर ज्या खात्यातून ती रक्कम आली त्याच खात्यामध्ये ती वळती केली, असे राजू मेश्राम यांनी सांगितले. दरम्यान, या प्रकाराची दिवसभर चर्चा सुरू असतानाच ही बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली.

बँकेने एलआयएनला ९ अंक अनेकदा लावल्याने प्रकार
गुगल पे किंवा फोनपेच्या माध्यमातून एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्कम इतर खात्यामध्ये पाठवता येत नाही. त्यासाठी रकमेची मर्यादा ठरवलेली असते. विशेष म्हणजे या मजुराच्या खात्यात ४ लाख ५० हजार रुपये जमा असल्याने बॅँकेकडून आधार लिंक करण्यासाठी अर्थात केवायसी करण्यासाठी एलआयएन लावण्यात आली. यासाठी एक रक्कम नोंदवावी लागते. तेव्हा बॅँकेकडून ९ हा अंक अनेकदा लावल्याने हा प्रकार घडला. मात्र, नंतर आलेली ही रक्कम पुन्हा संबंधित खात्यात परत पाठवण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, या प्रकाराची सर्वत्र चर्चा होती.

बातम्या आणखी आहेत...