आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोपी निघाला राष्ट्रवादीचा पदाधिकारी:बँकेची 1.89 कोटींची फसवणूक; 2 महिन्यांपूर्वी जयंत पाटलांच्या उपस्थितीत केला होता पक्षप्रवेश

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

1 कोटी 89 लाखांनी बँकेची फसवणूक करणाऱ्या आरोपीला लकडगंज पोलिसांनी गजाआड केले आहे. दोन महिन्यापूर्वी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अल्पसंख्यांक समाजाचा तरुण चेहरा म्हणून पक्षात प्रवेश दिलेल्या गुलाम अश्रफीला बँकेच्या फसवणूक प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

पोलिस उपायुक्त गजानन राजमाने यांनी दिलेल्या माहितीनुसार गुलाम अश्रफीने त्याच्या 'यंग फोर्स' या संघटनेच्या माध्यमातून शेकडो गरीब टॅक्सी चालकांसह इतर वाहन चालकांची फसवणूक केल्याचे चौकशीत उघड झाले आहे. लकडगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीत इतवारीत बँक ऑफ महाराष्ट्रची शाखा आहे. गुलाम अशरफी वल्द प्यारे अशरफी (वय 40) याने 1 कोटी 89 लाखांनी फसवणूक केली. या प्रकरणी पोलिस ठाण्यात भादंवि कलम 420, 406, 409, 471 आदी कलमांद्वारे गुन्हा दाखल करण्यात येऊन गुलाम अशरफी वल्द प्यारे अशरफी याला अटक करण्यात आली.

अशाप्रकारे करायचा फसवणूक

गरीब वाहन चालकांना बँकेतून कर्ज घेऊन महागडे वाहन खरेदी करायला लावायचे, नंतर ते बँकेचे हप्ते भरण्यास अपयशी ठरल्यानंतर त्यांना तेव्हा सुरुवातीला बँकेच्या वसुली पथकाच्या कारवाईपासून संरक्षण द्यायचे, आणि नंतर स्वतः बँकेसोबत सेटलमेंट करून हप्ते थकल्यामुळे जप्त झालेले वाहन लिलावात कवडीमोल भावात स्वतः खरेदी करायचे ही त्याची पद्धत होती. याच पद्धतीने गुलाम अश्रफीने अनेक ट्रक्स, जेसीबी, फॉर्च्युनरसारख्या महागड्या गाड्या आणि अनेक मालवाहतूक वाहन आपल्या नावावर करून घेतल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे.

बनावट कागदपत्रांवर कर्जाची उचल

इतकेच नाही तर गुलाम अश्रफीने आपण वेस्टर्न कोल फिल्ड्स कंपनीचा अधिकारी असल्याचे सांगत खोट्या सॅलरी स्लिप आणि इतर कागदपत्रे तयार करून बँक ऑफ महाराष्ट्रातून पहिल्यांदा एक कोटी तर दुसऱ्यांदा 89 लाख रुपयांचे कर्ज उचलले. बँक ऑफ महाराष्ट्र आणि इतर काही वित्तीय संस्थांनी त्याच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्यानंतर सखोल तपास करून पोलिसांनी काळजी म्हणून गुलाम अश्रफीला सोमवारी रात्री उशिरा अटक केली आहे.

बातम्या आणखी आहेत...