आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

25 दिवसांच्या उपोषणानंतरही प्रशासनाचे दुर्लक्ष:नक्षल सप्ताहामुळे मेडीगड्डा धरणग्रस्तांचे आंदोलन आठवडाभर पुढे ढकलले

नागपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गडचिरोली जिल्ह्यातील मेडीगड्डा धरणासाठी अधिग्रहित जमिनीचा योग्य मोबदला देण्यात यावा यासह विविध मागण्या घेऊन 12 गावातील शेतकरी सिरोंचा तहसील कार्यालयापुढे मागील 25 दिवसांपासून साखळी उपोषण करीत आहे. परंतु जिल्हा प्रशासनाकडून अद्याप दखल घेण्यात आलेली नाही.

उलट नक्षल सप्ताहाचे कारण पुढे करून प्रशासनाने शांततेत सुरू असलेले आंदोलन काही काळ स्थगित करायला लावल्याने धरणग्रस्त शेतकऱ्यांमधून रोष व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे 11 डिसेंबर पासून शेतकरी पुन्हा उपोषणाला बसणार आहे.

पुरामुळे शेतीचे नुकसान

राज्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या सिरोंचा तालुक्यातील 12 गावातील शेतकरी मेडीगड्डा धरणामुळे बाधित झाले. दरवर्षी येणाऱ्या पुरामुळे शेतीचे अतोनात नुकसान होत असते. धरणाच्या उभारणीच्या वेळेस धरणक्षेत्रात येणारी 373.80 हेक्टर जमीन अधिग्रहित करण्यात आली होती. त्यापैकी तत्काळ गरज असलेली 234.91 हेक्टर जमीन तेलंगणा सरकारे 10.50 लक्ष एकर प्रमाणे थेट खरेदी केली. त्यानंतर धरणाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. परंतु उर्वरित 138.91 हेक्टर अधिग्रहित जमिनीची भूसंपादन प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही.

नेत्यांना शेतकऱ्यांची भेट घ्यायला वेळ नाही

रखडलेली भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करून योग्य मोबदला देण्यात यावा, पीडितांची प्रकल्पग्रस्त म्हणून नोंद व्हावी यासह विविध मागण्या घेऊन 12 गावातील शेतकऱ्यांनी अनेकदा आंदोलने केली, निवेदन दिले. पण उपयोग झाला नाही. जिल्ह्यात 37 कलम लागू असल्याने त्यांना सामूहिक पद्धतीने आंदोलन करण्याची परवानगी मिळाली नाही. त्यामुळे पीडित शेतकरी मागील 25 दिवसांपासून साखळी पद्धतीने उपोषण करीत होते. यादरम्यान तहसीलदार सोडल्यास शासन, प्रशासनाकडून एकाही प्रतिनिधीने उपोषणस्थळी भेट दिलेली नाही. जिल्ह्यातील एका नेत्यालाही पीडित शेतकऱ्यांची भेट घ्यायला वेळ नाही.

पुन्हा उपोषण करणार

प्रशासन त्यांचे प्रश्न सोडविण्यापेक्षा आंदोलन कसे रोखता येईल याबाबत अधिक उत्सुक आहे. त्यामुळेच नक्षल सप्ताहाचे कारण पुढे करून शांततेत सुरू असलेले साखळी उपोषण बंद करायला लावले. मात्र, शेतकरी आंदोलनावर ठाम असून ते पुन्हा उपोषण सुरू करणार आहे. सोबतच हिवाळी अधिवेशनात देखील नागपूर येथे उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पालकमंत्र्यांनी देखील दुर्लक्ष केल्याने त्यांच्याबद्दल देखील रोष व्यक्त करण्यात येत आहे.

फडवणीसांवर टीका

सिरोंचा तालुक्यातील मेडीगड्डा धरणग्रस्त शेतकरी मागील चार वर्षांपासून योग्य मोबदला मिळावा यासाठी आंदोलन करीत आहे. गेल्या 25 दिवसांपासून पीडित शेतकरी साखळी उपोषणाला बसले आहे. पण एकही प्रशासकीय अधिकारी, नेते त्यांची दखल घेत नाही. हे दुर्दैवी आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः गडचिरोलीचे पालकमंत्री असून त्यांनाही शेतकऱ्यांसाठी वेळ नाही, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव डॉ. प्रणितकुमार जांभुळे यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...