आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराई-वेस्ट व मेडिकल वेस्टची मोठी समस्या देशासमोर आहे. यावर पुरेसे पुनर्वापर प्रक्रिया युनिट उभे नसताना आगामी काळात सोलार पॅनल वेस्टची समस्या गंभीर होऊ शकते. सोलार पॅनलमध्ये स्टील, प्लास्टिक, काच, सिलिकाॅन, अॅल्युनिमियम, तांबे याचा वापर होतो. सध्या घरोघरी सौर पॅनल लावले जातात. परंतु भविष्यातील धोक्याकडे कुणाचेच लक्ष नाही. येथील राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संस्था “नीरी’तील प्रधान वैज्ञानिक डाॅ. सुशांत बी. वाठ यांनी नीरीचे संचालक अतुल नारायण वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली सौर पॅनल वेस्टच्या धोक्यावर काम सुरू केले आहे. या पॅनलचे आयुर्मान सरासरी २५ वर्षे असते. लावल्यानंतर काही वर्षांनी त्याची ऊर्जानिर्मितीची क्षमता कमी होत जाते, असे वाठ यांनी सांगितले. १०० गिगावॅटचे उद्दिष्ट दूरच : रूफ टाॅप पॅनल्समधून किती काळ पुरेशी ऊर्जा निर्माण होईल, हे जाणून घेतल्याशिवाय सौरऊर्जेचा वापर करण्यासाठी येणारा आगाऊ खर्च समजणे कठीण आहे. २०२२ पर्यंत भारतात सौर पॅनलद्वारे १०० गिगावॅट वीजनिर्मितीचे उद्दिष्ट होते. मात्र ते पूर्ण होऊ शकलेले नाही.
पॅनल वेस्टचा ई-वेस्टमध्ये समावेश : येत्या १ एप्रिल २०२३ पास्ून नवीन ई-वेस्ट पाॅलिसी लागू होत आहे. त्यात सोलार पॅनल वेस्टचा ई-वेस्टमध्ये समावेश केला आहे. त्यामुळे ई-वेस्टची हाताळणी, साठवणूक, प्रक्रिया तसेच पुनर्वापरासाठी असलेले नियम यापुढे सोलार पॅनल वेस्टलाही लागू होणार आहेत.
भारतात सौर पॅनलची फक्त जुळणी : सौरऊर्जेला स्वच्छ आणि पर्यायी ऊर्जास्रोत म्हणून समोर आणले जात असताना त्याच्या नकारात्मक पर्यावरणीय परिणामांची चर्चा केली जात नाही. फोटोव्होल्टेइक पॅनलचे उत्पादन केले जात असताना कार्बन उत्सर्जन, विषारी कचरा, टिकाऊ खाण पद्धतीमुळे पर्यावरणावर प्रतिकूल परिणाम होतात. भारतात सौर पॅनलची निर्मिती नव्हे, फक्त जुळणी केली जाते. यातील सर्वात महत्त्वाचा घटक असलेला सिलिकाॅन आपल्याकडे होत नाही. चीन आणि तैवान याच्या उत्पादनात आघाडीवर आहेत.
...म्हणून ठरू शकतात धोकादायक
सीडीटीई सौर पॅनल कॅडमियममुळे तर
गॅलियम आर्सेनाइड पॅनल आर्सेनिकमुळे धोकादायक ठरू शकतात. काही जुने सिलिकॉन सौर पॅनल हेक्साव्हॅलेंट क्रोमियम कोटिंगसाठी घातक कचरा ठरू शकतात. नवीन, पातळ-फिल्म सौर पॅनलमध्ये सीआयएस/सीआयजीएस असतात आणि ते तांबे किंवा सेलेनियममुळे धोकादायक ठरू शकतात.
असा वाढत जाईल पसारा : स्टील, प्लास्टिक, काच कित्येक पटीने अधिक लागू शकते
आज...
१ मेगावॅट सोलार पीव्ही प्लँट उभारणीसाठी ५६ दशलक्ष टन स्टीलसह ६ दशलक्ष टन प्लास्टिक, ७० दशलक्ष टन काच, ७ दशलक्ष टन सिलिकाॅन, १९ दशलक्ष टन अॅल्युमिनियम, ७ दशलक्ष टन तांबे आणि ४७ दशलक्ष टन काँक्रीटचा वापर आज केला जात आहे.
२०३० मध्ये...
साेलार पॅनलद्वारे २८४० गिगावॅट विजेसाठी १५९ दशलक्ष टन स्टील, १७ दशलक्ष टन प्लास्टिक, १९९ दशलक्ष टन काच, २० दशलक्ष टन सिलिकाॅन, ५४ दशलक्ष टन अॅल्युमिनियम, २० दशलक्ष टन तांबे आणि १३३ दशलक्ष टन काँक्रीटची गरज लागू शकते.
२०५० पर्यंत...
८५१९ गिगावाॅट वीजनिर्मितीसाठी ४७७ दशलक्ष टन स्टील, ५१ दशलक्ष टन प्लास्टिक, ५९६ दशलक्ष टन काच, ६० दशलक्ष टन सिलिकाॅन, १६२ दशलक्ष टन अॅल्युमिनियम, ६० दशलक्ष टन तांबे आणि ४०० दशलक्ष टन काँक्रीट लागू शकते.
भारतात थारच्या वाळवंटापासून मध्य प्रदेशात आहेत सौरऊर्जा प्रकल्प
{ थारच्या वाळवंटात देशातील सर्वोत्कृष्ट सौरऊर्जा प्रकल्प सुरू झाला आहे. यातून ७०० ते २१०० गिगावॅट ऊर्जानिर्मितीची क्षमता.
{ मध्य प्रदेशातील नीमचमध्ये गुजरातच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी १ मार्च २०१४ रोजी सर्वात मोठ्या प्रकल्पाचे उद्घाटन केले होते.
{ जवाहरलाल नेहरू सौरऊर्जा प्रकल्प २०२२ पर्यंत २०,००० मेगावॅट ऊर्जा निर्मितीच्या उद्दिष्टासह केंद्र सरकारने सुरू केला होता.
२०७०पर्यंत कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण शून्य टक्के करण्याचे ध्येय
गेल्या काही दशकांत भारतातील विजेची मागणी वाढत चालली आहे. २०५०पर्यंत वीजनिर्मितीतून होणाऱ्या कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण ९०% कमी करण्याचे उद्दिष्ट आहे. भारताने २०७० पर्यत कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण ०% करण्याचे महत्त्वाकांक्षी ध्येय ठेवले आहे. १९८० ते २०१८ या कालावधीत जागतिक ऊर्जेचा वापर ताशी ७,३२३ ते २३,३२१ बिलियन किलोवॅट इतका वाढला होता. भारतात हेच प्रमाण ताशी ९८ ते १,२६५ बिलियन किलोवॅट इतके वाढले होते. यावर मात करण्यासाठी सौर पॅनलद्वारे ऊर्जानिर्मितीला प्रोत्साहन देण्यात आले.
हे ठरू शकते धोकादायक
सौर पॅनलच्या कचऱ्यात चांदी, शिसे, आर्सेनिक व कॅडमियमसारख्या जड धातूंचा समावेश असू शकतो. न वापरलेले पॅनल टाकून देण्यामुळे वातावरणाच्या संपर्कात आल्यानंतर यातील काही घटक पर्यावरणासाठी घातक ठरू शकतात.
पुनर्वापराचे स्पष्ट धोरण नाही
एकीकडे हा धोका वाढत चालला असला तरी साेलार पॅनल वेस्टचा पुनर्वापर वा पुनर्प्रक्रियेबाबत भारतात अजून तरी स्पष्ट धाेरण नाही. आयुर्मान संपल्यानंतर सोलार पॅनलचे काय करायचे, हा मोठा प्रश्न भविष्यात निर्माण होऊ शकतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.