आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्य राखीव दलाच्या मरपल्ली पोलिस मदत केंद्रात कार्यरत एका जवानाने दुसऱ्या जवानावर गोळी झाडून नंतर स्वत:ही आत्महत्या केली. ही घटना बुधवारी दुपारी चार ते साडेचार वाजेच्या सुमारास गडचिरोलीत घडली. यात दोघांचाही मृत्यू झाला.
गडचिरोली मुख्यालयापासून सुमारे १२५ किलाेमीटर अंतरावर दुर्गम भागात असलेल्या उपविभाग जिमलगट्टा अंतर्गत येणाऱ्या पोमके मरपल्ली येथे ही घटना घडली. श्रीकांत बेरड (३५) व बंडू बन्सी नवथर (३३) ही मृत जवानांची नावे आहेत. हे दोघही एसआरपीएफ ग्रुप-१(पुणे) चे जवान होते. श्रीकांत बेरड हा अहमदनगर जिल्ह्यातील दरेवाडी येथील रहिवासी होता तर बंडू बंसी नवथर हा याच जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील पिंपरी ( शहाळी ) येथील रहिवासी होता.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्य राखीव दलाच्या कॅम्पमध्ये जवानांना विश्रांतीसाठी खोल्या बांधण्यात आलेल्या आहेत. बुधवारी दुपारी श्रीकांत बेरड कॅम्पमधील त्याच्या आराम कक्षात आराम करीत होता. तर बंडू नवथर ड्यूटीवर होता. चार वाजेच्या सुमारास ड्यूटी संपल्यावर बंडू रूमवर आला. त्यावेळी श्रीकांतने अचानक बंडूवर गोळ्या झाडल्या. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यावेळी खाेलीत आणखी चार जवान होते. या घटनेने हादरलेल्या या जवानांनी श्रीकांत आपल्यालाही मारेल या भीतीने खोलीतून पळ काढला.
बंडूवर गोळी झाडल्यानंतर दुसऱ्या कक्षाच्या बाजूला जाऊन श्रीकांतने स्वत:वर गोळी झाडली. ही गोळी कानाखाली न लागता डोक्याच्या मागील बाजूस लागल्याने कवटीतून मेंदू बाहेर येऊन त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे समजते. श्रीकांत बेरडने बंडूवर गोळी झाडल्याचे नेमके कारण समोर येऊ शकलेले नाही.
रागातून कृत्य केल्याचा संशय
श्रीकांत व बंडू या दोन्ही जवानांमध्ये पूर्वीच कुठल्यातरी कारणावरून वाद झाला असावा. तो मनात धुमसत असताना पराकोटीच्या संतापातून श्रीकांतने बंडूवर गोळी झाडली असावी असा पाेलिसांना प्राथमिक संशय आहे. पण ते कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.