आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nagpur
  • After Twenty eight Years, The Wound Of Gowari Society Was Healed, 114 Martyrdom Of Gowari Brothers; But, The Government Level Continues To Neglect

अठ्ठावीस वर्षांनंतर गोवारी समाजाची जखम सुकली:114 गोवारी बांधवांचे हौतात्म्य; पण, शासन स्तरावर उपेक्षा कायम

नागपूर4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एरव्ही संपूर्ण विदर्भातून आलेल्या गोवारी समाज बांधवांच्या गर्दीने फुलून जाणारा गोवारी स्मारक परिसर बुधवार, 23 रोजी मात्र दरवर्षी कमी होत जाणाऱ्या उपस्थितीने उदास झाला होता. नेहमी प्रमाणे स्मारकाकडे येणारी चारही बाजूची वाहतूक कठडे लावून बंद करण्यात आली होती. गोवारी बांधवांची मतपेढी मजबूत नसावी कदाचित म्हणून राजकीय नेते इकडे फिरकत नाही.

मॉरिस कॉलेज टी-पॉइंट येथील शहीद गोवारी स्मारक परिसरात एकेकाळी लाखोच्या संख्येने येणाऱ्या गोवारी बांधवांची उपस्थिती आता कमी होत आहे. मागण्यांच्या बाबतीत शासकीय स्तरावरही उपेक्षा करण्यात येते. दरवर्षी गोवारी बांधव मुलाबाळांना घेऊन येतात. आपल्या दिवंगत नातेवाईकांना श्रद्धांजली वाहतात. नवी पिढी स्मारकात सेल्फी काढण्यात मग्न होते. एक दिवस तिथे वर्दळ असते. दुसऱ्या दिवशीपासून स्मारक परत उपेक्षेच्या गर्तेत हरवून जाते...

23 नोव्हेंबर 1994 रोजी नागपुरात हिवाळी अधिवेशनात आपल्या मागण्यांसाठी मोर्चा घेऊन आलेल्या गोवारींवर पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्यात 114 निष्पाप गोवारींचा मृत्यू झाला. शरद पवार त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. नागपूरच्या मॉरिस कॉलेज टी-पॉइंटला साधारण 50 हजार गोवारी सकाळीच धडकले. "आम्ही आदिवासीच आहोत,' असे ठामपणे सांगत, "आम्हाला आदिवासींच्या सवलतींपासून वंचित ठेवू नका', अशी त्यांची मागणी होती. लोखंडी पुलाकडून टी-पॉइंटकडे येणाऱ्या लहान रस्त्यांवर विधानसभेवर काढलेला हा मोर्चा अडवला होता. त्यावेळी इथला उड्डाण पूल नव्हता.

माजी आमदार सुधाकर गजबे, आदिवासींचे नेते आणि माजी राज्यमंत्री डॉ. राजेंद्र गजबे या मंडळींच्या नेतृत्वात गोवारी बाया-माणसं आणि मुलं आपापल्या शिदोऱ्या बांधून नागपुरात संपूर्ण विदर्भातून धडकले होते. शदर पवार मोर्चाच्या भेटीला येत नाहीत, असे समजताच मोर्चात आलेल्या गोवारींमध्ये असंतोष उफाळून आला. सायंकाळी परिस्थिती हाताबाहेर जाते की काय, या भीतीपोटी पोलिसांनी मोर्चावरच लाठीहल्ला केला. त्यातून चेंगराचेंगरी झाली आणि 114 गोवारींचा मृत्यू झाला. मॉरीस कॉलेज टी-पॉईंटला त्यानंतर आजचे गोवारी शाहिद स्मारक उभारण्यात आले. दरवर्षी गोवारी बांधव इथे आपल्या सहवेदना प्रकट करण्यास न चुकता येतात. घटनेत मृत्यू झालेल्या सर्व गोवारींची नावे या स्मारकावर नमुद करण्यात आली आहेत.

न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी करा

गोवारी ही स्वतंत्र आदिवासी जमात आहे, हा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं मंगळवार, 14 ऑगस्ट 2018 रोजी दिला. त्यामुळे 28 वर्षांहून अधिक काळापासून सुरू असलेल्या गोवारींच्या संघर्षाला यश मिळाले. पण ते यश पूर्णपणे गोवारींच्या पारड्यात पडलेले नाही. कारण न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी सरकारने अजूनही केलेली नाही.

बातम्या आणखी आहेत...