आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजयुमोचे 'मविआ'विरोधात आंदोलन:प्रकल्पांच्या पळवापळवीवरून खोटे आरोप करणाच्या निषेधात आक्रमक

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वेदान्त फाॅक्सकाॅन, टाटा एअरबस, सॅफराॅनसह अन्य प्रकल्प राज्यातून गुजरातमध्ये नेण्यात येत आहे. राज्यातील प्रकल्पांच्या या पळवापळवी विरोधात शहर राष्ट्रवादी काँग्रेस, शहर युवक काँग्रेस आंदोलने करीत असताना विरोधक खोटी माहिती पसरवित असल्याचा आरोप करीत भारतीय जनता युवा मोर्चाने मंगळवारी दुपारी आयटी पार्क चौकात आंदोलन करीत महाविकास आघाडीच्या खोटारडेपणाचा निषेध केला. महाविकास आघाडीच्या काळातच राज्याबाहेर गेलेले प्रेकल्प शिंदे-फडणवीस सरकारमुळे बाहेर गेल्याचे निखालस खोटे आरोप करीत विराेधक विद्यमान सरकारला बदनाम करीत असल्याचा आरोप यावेळी भाजयुमोने केला.

राज्यातील शिंदे फडणवीस सरकार चांगले काम करीत असल्याने आरोप करणाऱ्यांचे चांगलेच फावले असून त्याचाच फायदा घेत ते खोटी माहिती पसरवत असल्याचा आरोप शिवानी दाणी यांनी केला. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते पत्रकार परिषद घेत बिनबुडाचे आरोप करीत असल्याचे भाजयुमो अध्यक्ष शिवानी दाणी यांनी सांगितले.

प्रकल्पांच्या पळवापळवी विरोधात शहर राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी तीव्र आंदोलन करीत निषेध केला. शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दुनेश्वर पेठे यांच्या नेतृत्वात धरमपेठेतील चिल्ड्रेन ट्रॅफिक पार्क येथून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धरमपेठ त्रिकोणी पार्क जवळील निवासस्थानावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला. याची आधीच माहिती लागल्याने पोलिसांनी तगडा पोलिस बंदोबस्त लावला होता. उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या घराकडे जाणारे रस्ते लोखंडी कठडे लावून बंद करण्यात आले होते.

यापूर्वी प्रदेेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या नेतृत्वात नागपुरातील मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानासमोर आंदोलन करण्यात आले होते. युवक काँग्रेसने गुजरातचे मुख्यमंत्री असा कागद रामगिरीवरील नामफलकावर लावला होता. येथील प्रकल्प गुजरातला पळवून नेत असल्यामुळे येथे बेरोजगारी वाढत असल्याचा आरोप युवक काँग्रेसने केला होता.

काँग्रेस व राष्ट्रवादी पाठोपाठ "आप'नेही प्रकल्प राज्याबाहेर नेण्याच्या विरोधात संविधान चौकात आंदोलन केले होते. राज्यातील ईडी सरकारला सद्बुद्धी मिळावी यासाठी आपने संविधान चौकात यज्ञ केला. तसेच प्रकल्प राज्याबाहेर जात असल्याने येथे बेरोजगारी वाढत आहे. त्यामुळे भीक मागो आंदोलनही केले होते. यज्ञ केल्यामुळे तरी ईडी सरकारला सद्बुद्धी मिळेल अशी टिका आपने केली होती.

बातम्या आणखी आहेत...