आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:कृषिसंकट : चीनकडून अॅग्रो टेररिझमची शक्यता, अमेरिका, जपान, कॅनडानंतर संशयास्पद बियाण्यांचा होऊ शकतो भारतात शिरकाव

नागपूर (अतुल पेठकर)एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिका, कॅनडा, यूके, न्यूझीलंड, जपान आणि काही युरोपीय देशांत शिरकाव केल्यानंतर जैवविविधतेला धोका असलेले बियाणे भारतातही शिरकाव करण्याची दाट शक्यता असून याबाबत देशातील कृषी यंत्रणेने जागरूक राहावे, असा सावधगिरीचा इशारा केंद्रीय गुणवत्ता नियंत्रण उपायुक्त डाॅ. दिलीप श्रीवास्तव यांनी देशातील सर्व राज्यांतील कृषी मंत्रालये, कृषी िवभाग, बियाणे उत्पादक कंपन्यांना एका पत्राद्वारे दिला आहे.

जपान आणि कॅनडासारख्या देशातील अधिकाऱ्यांनी हे बियाणे पर्यावरणाला नुकसानकारक असल्याचा इशारा आधीच दिला आहे. मिलो गव्हासोबत आलेल्या काँग्रेस गवतासारखे ते फोफावू शकते. या संशयास्पद बियाण्यांची पाकिटे चोरट्या मार्गाने भारतातही पोहोचण्याची शक्यता आहे. असे कृत्य “अ‍ॅग्रो-टेररिझम’ (कृषि दहशतवाद) असू शकते. दिशाभूल करणारे लेबल असलेली रहस्यमय बियाण्यांची पाकिटे चीनहून येऊ शकतात.

भारत, जपान, कॅनडा, अमेरिका आणि इंग्लंड येथे पार्सलमधून वाहतूक झाल्याचा संशय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. आंतरराष्ट्रीय सीड टेस्टिंग एजन्सीने (आयएसटीए) भारत सरकारला संशयास्पद लेबल असलेल्या बियाण्यांच्या पाकिटाबाबत सतर्कता बाळगण्यास सांगितले आहे. नॅशनल सीड असोसिएशन ऑफ इंडियाने (एनएसएआय) देखील याबाबत सतर्क राहण्यास सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर हे पत्र सर्व राज्यांना पाठवण्यात आले आहे.

एनएसएआयचे संचालक इंद्रशेखर सिंग (संचालक धोरण आणि प्रसार) यांनी चीन गेल्या २०-२५ वर्षांपासून भारतीय जंतुनाशक आणि बियाण्यांचा अभ्यास करीत असल्याचे यापूर्वीच सांगितले आहे. अशा बियाणे दहशतवादामुळे अन्नसुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. चीनमधील प्रगत जैवतंत्रज्ञानामध्ये भारतीय अन्न उत्पादन नष्ट करण्याची क्षमता आहे. एनएसएआय केंद्र सरकारला दूषित बियाणे भारतात येणे रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्याची विनंती करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रात अजून तरी संशयास्पद बियाणे आढळून आलेले नाही
केंद्रीय गुणवत्ता नियंत्रण उपायुक्त डाॅ. दिलीप श्रीवास्तव यांचे पत्र प्राप्त झाले आहे. मात्र महाराष्ट्रात अजून तरी असे कोणतेही संशयास्पद बियाणे आढळून आलेले नाही. सर्व आंतरराज्य सीमांवर तपासणी नाके आहेत. याशिवाय कृषी सेवा केंद्रांपर्यत सर्वांना सावध राहण्यास सांगितले आहे. असे संशयास्पद बियाणे आढळल्यास तत्काळ अटकाव करण्यात येईल. - दिलीप झेंडे, प्रभारी कृषी संचालक (निविष्ठा व गुणनियंत्रक) तथा िवभागीय कृषी सहसंचालक, पुणे

बातम्या आणखी आहेत...