आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nagpur
  • Air Pollution Report Updates: In State 19 Cities That Can Not Reach Air Quality; In One Year 1.8 Lakh Are Kills From Air Pollution; News And Live Updates

अहवाल:हवेची गुणवत्ता गाठू न शकणारी सर्वाधिक 19 शहरे महाराष्ट्रात; डॉक्टरांचा इशारा; राज्यात दरवर्षी 1.8 लाख लोकांचा प्रदूषित हवेमुळे मृत्यू

नागपूर2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राहत्या घरातून निर्माण हाेणाऱ्या प्रदूषणाचाही वाटा

प्रदूषित हवेमुळे लहान मुलांच्या मेंदूचा विकास होण्याच्या प्रक्रियेमध्ये बाधा येते. परिणामी एखादी गोष्ट अधिक काळ लक्षात न राहणे, विसर पडणे या समस्या निर्माण होतात. हे लक्षात घेता नागरिकांनी बाहेर पडताना काळजी घ्यावी, असे आवाहन तज्ज्ञांनी चर्चासत्रात बोलताना केले.सीओपीडी हे सर्वाधिक मृत्यू होण्यासाठी क्रमांक दोनचे कारण आहे आणि सीओपीडीचे कारण प्रदूषित हवा आहे, असे डॉ. संदीप साळवी यांनी सांगितले. कोविड महामारीनंतर हवा प्रदूषण ही सर्वात मोठी महामारी येऊ घातली आहे, असे प्रतिपादन डॉ. समीर अरबट यांनी केले.

“कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हवा प्रदूषणाचे मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम’ या ऑनलाइन वेबिनारमध्ये ते बोलत होते. जागतिक आरोग्य संघटनेनुसार जगभरात हवा प्रदूषणाने दरवर्षी जवळपास ७० लाख लोक मरण पावतात, तर महाराष्ट्रात दरवर्षी १.८ लाख लोकांना प्रदूषित हवेमुळे मृत्यूला सामोरे जावे लागते असे लॅन्सेट हेल्थ जर्नलचा रिपोर्ट सांगतो. त्यातच कोरोनाचे संकट महाराष्ट्रभरात जोर धरत आहे. कोरोना हा श्वसनाचा आजार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशातच हवेची गुणवत्ता गाठू न शकणाऱ्या शहरांची सर्वाधिक संख्या (१९ शहरे) महाराष्ट्रात असल्याने महाराष्ट्रातील नागरिकांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. याच धर्तीवर हवा प्रदूषणाचे मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

या चर्चासत्रात उद्देशून बोलताना पल्मोकेअर रिसर्च अँड एज्युकेशन, पुणेचे डायरेक्टर डॉ. संदीप साळवी म्हणाले की, प्रदूषित हवा ही केवळ घराबाहेरील वातावरणातच असते आणि हवा प्रदूषणाचे स्रोतही घराबाहेरच असतात असा बहुतांशी लोकांचा समज असतो. मात्र, असे समजणे चूक ठरेल. कारण घरात आपण एक मच्छराची कॉइल जाळतो. त्यातून निघणारा जो धूर आहे तो जवळपास १०० सिगारेट्स ओढल्यावर जेवढे घातक प्रदूषण आपल्या शरीरात जाते तेवढे घातक प्रदूषण घराच्या आत निर्माण करण्यास कारणीभूत ठरते. आपण घरात जाळणारी एक धूप अगरबत्ती ही ५०० सिगारेट्स एवढे घातक प्रदूषण आपल्यासाठी घरात तयार करते. आजही ग्रामीण भागात जेवण बनवण्यासाठी चुलीचा वापर केला जातो. त्यात जाळले जाणारे जे घटक आणि त्यातून निर्माण होणारे प्रदूषण हे सीओपीडीचे मुख्य कारण ठरताना दिसत आहे. केवळ औद्योगिक क्षेत्रातून, वाहनांतून हवा प्रदूषण होत आहे असे नाही. आपणही या प्रदूषणात व्यक्तिगतरीत्या भर घालतो हे प्रत्येकाने मान्य करायला हवे.

लीड इंटरव्हेन्शनल आणि पल्मोनोलॉजिस्ट, क्रीम्स रुग्णालय, नागपूरचे डॉ. समीर अरबट म्हणाले - हवा प्रदूषण हे फुप्फुसासंबंधी आजार होण्यामध्ये आणि ते वाढण्यामध्ये महत्त्वाचे कारण आहे. हवा प्रदूषण हे फुप्फुसांच्या रोगप्रतिकारक क्षमतेवर आघात करते. त्यामुळे आम्हाला श्वसनाच्या गंभीर आजारांना सामोरे जावे लागते. आज कोरोना महामारीने संपूर्ण जग वेठीस धरले आहे. हवा प्रदूषण व कोरोना याचा थेट काही सबंध स्पष्ट झाले नसले तरीही येणाऱ्या काळात कोरोनानंतर सर्वात मोठी महामारी हवा प्रदूषणाच्या रूपाने येईल याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामुळे हवा प्रदूषणाच्या धोक्याला वेळीच आळा घालणे महत्त्वाचे आहे.

नानावटी सुपरस्पेशालिटी रुग्णालय, मुंबईच्या बालरोगतज्ज्ञ डॉ. अदिती शहा यांनी सहा महिन्यांपर्यंत नवजात बालकांमध्ये फुप्फुसांचा पूर्णतः विकास झालेला नसतो. अशा काळात लहान मुलांचा संपर्क जर प्रदूषित हवेशी आला तर त्यामुळे कायम स्वरूपाच्या फुप्फुसासंबंधी आजारांना मुलांना सामोरे जावे लागू शकते व गेल्या १० वर्षांत लहान मुलांमध्ये अशा प्रकारच्या आजारांचे सांगितले. केईएम रुग्णालय, मुंबईच्या डॉ. अमिता आठवले या मूले, महिला व वयोवृद्ध सर्वाधिक वेळ घरात राहतात त्यामुळे घरातील प्रदूषण हा आरोग्याला धोका निर्माण करणारे मुख्य कारण ठरत असल्याचे सांगितले.

राहत्या घरातून निर्माण हाेणाऱ्या प्रदूषणाचाही वाटा
वायू प्रदूषणामुळे २०१७ ते २०१९ दरम्यान झालेल्या एक लाख मृत्यूंसह उत्तर प्रदेशाखालोखाल महाराष्ट्र याबाबतीत देशातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य ठरले आहे. राष्ट्रीय स्वच्छ हवा कृती कार्यक्रमांतर्गत निश्चित करण्यात आलेल्या मानकांनुसार ही मानके पूर्ण करू न शकणारी व २०२४ पर्यंत २०-३० टक्के प्रदूषण कमी करण्याचे उद्दिष्ट ठरवलेली एकोणीस शहरे महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रातील वायू प्रदूषणात वाहने आणि उद्योग क्षेत्र (औष्णिक ऊर्जा प्रकल्पांसह), बांधकाम क्षेत्र आणि घन इंधनामुळे होणाऱ्या प्रदूषणाचा वाटा आहे तसाच राहत्या घरातून निर्माण होणाऱ्या प्रदूषणाचाही काही प्रमाणात वाटा असल्याचा या कार्यक्रमांतील निष्कर्ष काढण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...