आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबेळगाव, कारवार, निपाणी तसेच सीमाभागातील एक एक इंच जागा महाराष्ट्रात आली पाहीजे. यासाठी या हिवाळी अधिवेशनात ठराव मांडून तो नक्की मंजूर केला जाईल, अशी माहिती विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
विरोधक पाठिंबा देणार
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्राला एक इंचही जागा देणार नाही. तसा ठराव कर्नाटक विधिंडळात मांडू, असे वक्तव्य केले आहे. त्याला जशास तसे प्रत्युत्तर राज्य सरकारने द्यावे. विरोधक राज्य सरकारला पाठिंबा देईल, अशी भूमिका आज अजित पवारांनी मांडली.
महाराष्ट्राने रोखठोक भूमिका घ्यावी
अजित पवार म्हणाले, सीमावादावर कर्नाटक सरकारने काय करावे, हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र, सीमाभागातील एक एक इंच जागा महाराष्ट्रात आली पाहीजे, अशी आमची भूमिका आहे. यावर महाराष्ट्राची भूमिका अधिक स्पष्ट होण्यासाठी विधिमंडळात याबाबत ठराव मांडला जाईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी यासंदर्भात बोलू. त्यांनी याबाबत ठराव मांडल्यानंतर विरोधक त्याला पाठिंबा देतील व हा ठराव एकमताने विधिमंडळात मंजूर होईल, असा विश्वासही अजित पवार यांनी व्यक्त केला.
बोम्मई यांचे सातत्याने वादग्रस्त वक्तव्ये
अजित पवार म्हणाले, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आपल्या राज्यातील नागरिकांना बरे वाटावे, म्हणून सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. आमची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागणी आहे की, त्यांनी अशाच आक्रमक भूमिका घ्यायला हवी. कर्नाटक सरकारला जशास तसे प्रत्युत्तर द्यायला हवे.
बेळगाव, कारवार, निपाणी महाराष्ट्रात येईल
अजित पवार म्हणाले, गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीनंतरही कर्नाटक सरकारचा आडमुठेपणा गेलेला नाही. कोर्टात विषय असतानाही ते त्यांच्या भूमिकेला अडून आहेत. त्याचप्रमाणे आजा बेळगाव, कारवार, निपाणी नक्की महाराष्ट्रात येईल. एक एक इंच जागा महाराष्ट्रात आणू, अशी भूमिका आता महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांनी मांडून कर्नाटकला सडेतोड प्रत्युत्तर द्यायला हवे.
काय म्हणाले बसवराज बोम्मई?
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी समज दिल्यानंतरही कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई पुन्हा एकदा बरळले आहेत. महाराष्ट्राला इंचभरही जमीन देणार नाही, असे वक्तव्य बसवराज बोम्मई यांनी कर्नाटक विधिंडळात केले आहे. तसेच, याबाबतचा ठरावही विधिमंडळात मांडण्यात येईल, असे बसवराज बोम्मई यांनी सांगितले आहे. सविस्तर वाचा
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.