आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआपण पाकिस्तानात आहोत का, असा सवाल सोमवारी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हिवाळी अधिवेशनात उपस्थित केला. महाराष्ट्राच्या वाहनांवर कर्नाटकात रात्री-बेरात्री दगडफेक केली जाते. आपल्या ड्रायव्हरचे फोन येतात. पोलिस सहकार्य करत नाही, याप्रश्नी महाराष्ट्र सरकराने आक्रमक व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
एकीकडे विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सीमाप्रश्न उपस्थित केला. तर दुसरीकडे विधान परिषदेत अंबादास दानवे सीमाप्रश्नी आक्रमक झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रकरणी खंबीर भूमिका घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
घटनेची पायमल्ली सुरू...
अंबादास दानवे म्हणाले की, महाराष्ट्रातल्या नेत्यांना कर्नाटकात येण्याची बंदी घातलीय. मागच्या आठवड्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी एक बैठक घेतली. केंद्रीय गृहमंत्र्यांनी या प्रश्नी हस्तक्षेप केला. या हस्तक्षेपात दोन्ही बाजूने जैसे थे राहिले पाहिजे, अशी भूमिका घेतली. त्यामुळे कोणालाही तिकडे जायला आणि इकडे यायला बंदी नसावी अशी भूमिका घेतली. मात्र, आज आपल्या नेत्यांना अडवले जाते. आपण पाकिस्तानात आहोत काय? हिंदुस्थानात सगळ्यांना कुठेही जाण्याचा अधिकार घटनेने दिला आहे. मात्र, महाराष्ट्राचा एखादी व्यक्ती कर्नाटकात जाऊ शकत नाही. मग ही भारत-पाकिस्तान सीमा आहे का? कर्नाटक अशी भूमिका घेत असताना, सरकारने लक्ष देण्याची आवश्यकताय त्यांनी व्यक्त केली.
हे वागणे बरे नव्हे...
अंबादास दानवे म्हणाले, सीमा भागातल्या ८६५ गावांचा प्रश्न आजचा नाही. मागच्या महिन्यात महाराष्ट्र सरकारने उच्चाधिकारी समितीची बैठक घेतली. मी ही त्या बैठकीला होतो. या बैठकीत काही निर्णय घेतले गेले. त्याचीही अंमलबजावणी सुरू झाली. मुख्यमंत्री धर्मादाय निधी कधी बंद झाला होता माहित नाही. मात्र, तो पुन्हा सुरू करण्याचा निर्णय झाला. आपले दोन मंत्री बेळगावला जाणार होते. त्यांनी पुन्हा तारखा वाढवल्या. तीन ऐवजी सहा डिसेंबर. असे सामंजस्याचे वातावरण असताना कर्नाटक सरकार जी भूमिका घेत आहे, ते चुकीचे आहेच.
बोम्मईंची दुटप्पी भूमिका...
खरे तर २००६ पासून सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. याप्रकरणी कर्नाटक सरकार दुटप्पी भूमिका घेत आहे. एकीकडे कर्नाटक सरकार सुप्रीम कोर्टाला हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही म्हणते. संसदेने याप्रश्नी लक्ष घालावे, अशी भूमिका घेत आहे. त्यामुळे महाराष्ट्राने सर्व पक्षभेद विसरून एकत्र येत खंबीर भूमिका घेण्याची गरजय, अंबादास दानवे यांनी व्यक्त केली.
सरकारने भूमिका मांडावी...
अंबादास दानवे पुढे म्हणाले की, आपल्याला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. मात्र, आपली वाहने तिकडे गेली की त्यांच्यावर दगडफेक केली जाते. वाहनावर छत्रपती शिवरायांचा फोटो असेल, महाराष्ट्राची पासिंग असेल वा एखादा मराठी शब्द लिहिलेला असेल, तर अशी वाहने टार्गेट केली जातात. त्यांच्यावर हल्ला केला जातो. रात्री-बेरात्री वाहनांवर दगडफेक होतेय. कित्येक ड्रायव्हरचे आम्हाला फोन येत आहेत. त्यात पोलिस सहकार्य करत नाही. या प्रश्नी सरकारने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी त्यांनी केली.
जशास तसे उत्तर द्या...
कर्नाटकचे मुख्यमंत्री अतिशय आक्रमकनेते भूमिका मांडतात. महाराष्ट्रातल्या जत भागात पाणी सोडतात. सोलापूर आमचे, अक्कलकोट आमचे अशी भूमिका माडंतात. या भूमिकेमुळे मराठी माणसांमध्ये असंतोष निर्माण होतोय. या भूमिकेला तेवढ्याच आक्रमकतेने महाराष्ट्राने सामोरे गेले पाहिजे. नुसते सामोरे जावून चालणार नाही, तर इट का जवाब पत्थर से देण्याचे भूमिका घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.